लंडननं नीरव मोदीला अटक करण्यासाठी मागितले पुरावे, भारताकडून प्रतिसाद नाही- सूत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 08:18 AM2019-03-12T08:18:56+5:302019-03-12T08:19:08+5:30
भारतात हजारो कोटींचा घोटाळा करून नीरव मोदी हा लंडनमध्ये परागंदा झाला.
नवी दिल्ली- भारतात हजारो कोटींचा घोटाळा करून नीरव मोदी हा लंडनमध्ये परागंदा झाला. लंडनमधल्या रस्त्यावर नीरव मोदी हा खुलेआम फिरत असल्याचंही उघड झालं होतं. भारताकडून नीरव मोदीवर कारवाई व्हावी, यासाठी उशीर झालेला नाही, असंही भारतीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. परंतु NDTVच्या सूत्रांच्या माध्यमातून वेगळीच माहिती समोर आली आहे. लंडनमधल्या एका टीमनं नीरव मोदीविरोधात कारवाईसाठी भारतात येण्याची इच्छा व्यक्त केली होती, पण भारताकडून त्यांना कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.
NDTVया वृत्तवाहिनीला लंडनच्या सीरियस फ्रॉड ऑफिसमधून माहिती मिळाली आहे. पहिल्यांदा भारतानं ब्रिटनला जो अलर्ट पाठवला, तो फेब्रुवारी 2018मध्ये म्युच्युअल लीगल असिस्टेंस ट्रीटी (MLAT)अंतर्गत होता. नीरव मोदी आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात पंजाब नॅशनल बँकेतील 13 हजार कोटी रुपयांचा घोटाळा समोर आल्यानंतर हा अलर्ट ब्रिटनला पाठवण्यात आला होता.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी नीरव मोदी लंडनच्या रस्त्यावर फिरतानाचा व्हिडीओ समोर आला होता. यानंतर सक्तवसुली संचालनालयाकडून कारवाई करण्यात आली आहे. 'द टेलिग्राफ' वृत्तपत्राने नीरव मोदीचा हा व्हिडीओ शेअर केला होता. ईडीकडे आणखी पुरावे आल्यामुळे आम्ही पुरवणी आरोपपत्र दाखल केले असल्याचे ईडीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. नीरव मोदीचे भारतात प्रत्यार्पण करण्यात यावे अशी विनंती केंद्र सरकारने ब्रिटन, अमेरिका, इजिप्त या देशांना केल्याची माहिती आहे. ब्रिटनमधील गृहमंत्रालयाने ही विनंती स्थानिक न्यायालयाकडे पाठवल्याचीही चर्चा आहे. नीरव मोदी लंडनमधील वेस्ट एंड भागातील आलिशान फ्लॅटमध्ये राहत आहे. त्याला व्यवसाय करण्याकरिता ब्रिटन सरकारने राष्ट्रीय विमा क्रमांकही दिला आहे.