ब्रेक्झिटमुळे भारतीयांना ब्रिटनची सहल स्वस्त
By admin | Published: July 13, 2016 02:43 AM2016-07-13T02:43:42+5:302016-07-13T02:43:42+5:30
मौजमजेसह भारतीयांना सुट्टी घालवायची असेल, ब्रिटन खर्चाच्या दृष्टीने अगदी स्वस्तातले ठिकाण बनले आहे. यासाठी ‘ब्रेक्झिट’ला धन्यवादच दिले पाहिजेत.
नवी दिल्ली : मौजमजेसह भारतीयांना सुट्टी घालवायची असेल, ब्रिटन खर्चाच्या दृष्टीने अगदी स्वस्तातले ठिकाण बनले आहे. यासाठी ‘ब्रेक्झिट’ला धन्यवादच दिले पाहिजेत. ब्रिटिश जनतेने ‘ब्रेक्झिट’चा कौल देण्याच्या महिन्यापासून ब्रिटिश चलनाचे (पौंड स्टर्लिंग) मूल्य रुपयांच्या तुलनेत (१०१ वरून ८७ रुपये ३० पैैसे) १३ टक्क्यांनी घसरले आहे. त्यामुळे सहलींचे आयोजन करणाऱ्या भारतातील अनेक कंपन्या या संधीचा लाभ घेण्यासाठी भारतीय पर्यटकांना ‘चला स्वस्तात ब्रिटनला...’ अशी साद घालत आहेत. विमानभाडे आणि व्हिसा वगळता ब्रिटनच्या सहलीचा खर्च १० टक्क्यांनी कमी झाल्याचा या कंपन्यांचा दावा आहे.
सात दिवस-रात्रीच्या मुक्कामासह आधी एका जोडप्याला १ लाख ८० हजार रुपये खर्च यायचा. आता तो १ लाख ६२ हजार रुपयांवर आला आहे, असे भारतातील सर्वात मोठ्या ट्रॅव्हल कंपनीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
पाच दिवस आणि रात्रीच्या मुक्कामासह विविध पर्यटन स्थळांच्या सैरसफाट्यासाठी माणसी ६४ हजार ६१० रुपये मोजावे लागायचे. आता ६१ हजार ७७९ रुपयांत पाच दिवस मुक्कामासह ब्रिटनची सैर करता येणार आहे. ब्रेक्झिटच्या प्रभावाने पौंडचे मूल्य घसरल्याने हा खर्चही ५ टक्क्यांनी कमी झाला आहे. तेव्हा ब्रिटनची सैैर आधीच्या तुलनेत खूपच स्वस्त झाली आहे, यात दुमत नाही, असे ट्रॅव्हल पोर्ट ‘यात्रा’चे अध्यक्ष शरत ढाल यांनी म्हटले आहे.
गेल्या महिनाभरात पौंडचे मूल्य १२ टक्के घसरल्याने भारतीयांना ब्रिटनची सैर करण्याची पर्वणीच लाभली आहे. ब्रिटन सहलीचा खर्च किमान १० टक्क्यांनी कमी होईल.
तेव्हा मादाम तुसात, लंडन आय यासारख्या आकर्षक स्थळांना भेट देण्याच्या खर्चासह भोजन खर्चही स्वस्त होईल. ब्रिटनमधील खरेदीही १० टक्क्यांनी कमी होणार असल्याने, भारतीयांना मनसोक्त खरेदी करता येईल. ही पर्वणी साधत नजीकच्या काळात भारतीय मोठ्या संख्यने ब्रिटन वारीसाठी नोंदणी करतील, अशी आशा कॉक्स अँड किंग्जचे
करण आनंद यांना आहे. भारतीयांना ब्रिटनचे भारी आकर्षण आहे. २०१५ मध्ये साडेचार लाख भारतीयांनी ब्रिटन भेट दिली होती. या वर्षी यात किमान १५ टक्के वाढ होईल, असेही त्यांना वाटते.