ब्रिटिश जोडप्यास बिहारात मारहाण, लुटण्याचाही प्रयत्न; पोलिसांनी केली दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 05:00 AM2017-11-08T05:00:14+5:302017-11-08T05:00:42+5:30
बिहारमध्ये पर्यटनासाठी आलेल्या ब्रिटिश जोडप्याशी गैरवर्तणूक करून, त्यांना लुटण्याचा प्रयत्न करणा-या एका टोळीला पोलिसांनी अटक केली.
पाटणा : बिहारमध्ये पर्यटनासाठी आलेल्या ब्रिटिश जोडप्याशी गैरवर्तणूक करून, त्यांना लुटण्याचा प्रयत्न करणा-या एका टोळीला पोलिसांनी अटक केली. हा प्रकार रविवारी घडला. या जोडप्याने तेथून पळ काढला आणि लगेच तक्रार केली, असे पोलिसांनी सांगितले.
आम्ही गंगेच्या काठावरील तंबूत असताना दोन जण तिथे आले. त्यांच्या हातात काठ्या व शस्त्रे होती. त्यांनी आमच्याशी गैरवर्तन करून आमच्याकडील चीजवस्तू लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, आम्ही वेळीच तिथून पळ काढला आणि नदी पार केली, असे या जोडप्याने पोलिसांना सांगितले.
तिथे आम्ही पोलिसांची मदत मागितली, असे त्या जोडप्यातील मॅथ्यू याने सांगितले. त्यानंतर पोलिसांनी तातडीने पावले उचलत, लूटमारीचा प्रयत्न करणाºया दोघांचा दोन तासांत शोध घेतला. पर्यटक वा कोणाही बाबतीत असे घडू नये, यासाठी आम्ही आणखी प्रयत्न करू, असे पोलिसांनी सांगितले.
गेल्या आठवड्यात एका स्वीस जोडप्याला उत्तर प्रदेशच्या आग्राजवळील फतेहपूर सिक्री येथे चार जणांनी बेदम मारहाण केली होती. त्यांना दंडुक्याने मारले होते. त्यातील तरुणीच्या हाताचे हाड मोडले असून, तिच्या सहकाºयाला कानाने ऐकू येईनासे झाले आहे.
त्यांच्यावर दिल्लीत उपचार करण्यात आले. ते रस्त्यावर रक्तबंबाळ अवस्थेत पडले असताना आणि मदतीची विनंती करीत असताना, कोणीही पुढे आले नाही. किंबहुना, अनेक जण मोबाइलवर त्यांचे फोटो काढत होते. या गंभीर प्रकाराची परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी दखल घेतली आणि उत्तर प्रदेश सरकारकडून अहवाल मागविला होता. या जोडप्याला मारहाण करणाºया चौघांचा उत्तर प्रदेश पोलीस शोध घेत आहेत. त्यापैकी एकाची ओळख पटली असून, त्याच्या भावाला पोलिसांनी ताब्यात
घेतले आहे.