प्रचारासाठी राजकीय पक्षांना प्रसारण कालावधी
By admin | Published: September 25, 2014 04:19 AM2014-09-25T04:19:13+5:302014-09-25T04:19:13+5:30
महाराष्ट्र आणि हरियाणा राज्यातल्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी राष्ट्रीय आणि मान्यताप्राप्त प्रादेशिक पक्षांना दूरचित्रवाणी आणि रेडियोवरून प्रचाराची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
मुंबई : महाराष्ट्र आणि हरियाणा राज्यातल्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी राष्ट्रीय आणि मान्यताप्राप्त प्रादेशिक पक्षांना दूरचित्रवाणी आणि रेडियोवरून प्रचाराची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
ही सुविधा आॅल इंडिया रेडियो आणि दूरदर्शनच्या प्रादेशिक केंद्रांवर आणि महाराष्ट्र आणि हरियाणाच्या मुख्यालयांमध्ये उपलब्ध केली जाईल. प्रत्येक राष्ट्रीय आणि मान्यताप्राप्त प्रादेशिक पक्षाला ४५ मिनिटांचा एकूण कालावधी दिला जाणार असून, त्या व्यतिरिक्त वाढीव कालावधी पक्षांच्या गेल्या विधानसभा निवडणुकांमधल्या कामगिरीच्या आधारे दिला जाणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.
प्रसारणाच्या एका सत्रामध्ये १५ मिनिटांपेक्षा जास्त कालावधी कोणत्याही पक्षाला मिळणार नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या तारखेपासून निवडणुकीच्या तारखेच्या दोन दिवस आधीच्या तारखेपर्यंतच्या काळात हे प्रसारण करता येणार आहे. याच्या प्रत्यक्ष तारखा प्रसार भारती निवडणूक आयोगाशी चर्चा करून निश्चित करणार आहे, असे आयोगाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)