‘भावांनाे, माझे तुमच्यावर लक्ष आहे’; ऑर्बिटरने टिपली विक्रम लॅंडरची छबी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2023 09:15 AM2023-08-26T09:15:06+5:302023-08-26T09:15:16+5:30
चंद्रावर प्रज्ञान ८ मीटर चालला
बंगळुरू : ‘‘विक्रम’साेबत गेलेला मित्र प्रज्ञान राेव्हर हादेखील चंद्रावर आता फिरू लागला आहे. भारतीय अंतराळ संशाेधन संस्थेने (इस्राे) एक व्हिडिओ ‘एक्स’ या साेशल मीडिया व्यासपीठावर टाकला आहे. तर चंद्रयान माेहिमेशी संबंधित दुसऱ्या एका खात्यावरून दाेन फाेटाे ‘एक्स’वर टाकले आहेत. विक्रम लॅंडरमधून बाहेर पडण्यापूर्वी डाेकाणारा प्रज्ञान व्हिडीओमध्ये दिसताे. तर एका फाेटाेमध्ये विक्रम लॅंडर दिसत आहे. चंद्रयान-२च्या ऑर्बिटरने ही छबी टिपली असून तुमच्यावर नजर आहे, असेच ऑर्बिटरने विक्रम आणि प्रज्ञान या दाेघांना सांगितले. (वृत्तसंस्था)
व्हिडीओमध्ये काय?
विक्रम लँडर हळूहळू चंद्रावर उतरताे आणि पुढे जाऊ लागताे. या व्हिडीओचा प्रत्येक क्षण राेमांचकारी आणि प्रफुल्लित करणारा आहे. चंद्राला स्पर्श करून ताे पुढे जाताे, त्यावेळी त्याच्या चाकांचे ठसे उमटलेले दिसतात. याच ठशांमध्ये अशाेक स्तंभ आणि इस्त्रोची मुद्रा आपली छाप साेडणार आहे. राेव्हरच्या चाकांमध्ये या मुद्रा काेरण्यात आल्या आहेत.
‘आय स्पाय यू’ असे म्हणत हे फाेटाे पाेस्ट केले आहेत. ऑर्बिटरवरील कॅमेरा चंद्राच्या आसपास असलेल्या काेणत्याही देशाच्या कॅमेऱ्यांमध्ये सर्वाेत्तम आहे. ‘नासा’च्या ऑर्बिटरपेक्षाही कॅमेरा सरस आहे.
चंद्रावर प्रज्ञान ८ मीटर चालला
प्रज्ञान राेव्हरबाबत इस्राेने महत्त्वाची अपडेट दिली. राेव्हरच्या सर्व हालचाली पडताळून घेतल्या आहेत. चंद्रावर प्रज्ञान ८ मीटरपर्यंत चालला आहे. राेव्हरवर असलेले पेलाेड्स ‘एलआयबीएस’ व ‘एपीएक्सएस’ हे पेलाेड्स सुरू करण्यात आले आहेत. लॅंडर माॅड्युल, प्राेपल्शन माॅड्युल आणि राेव्हर यांचे काम सुरळीतपणे सुरू आहे.
इस्राेने हटविला फाेटाे
ऑर्बिटरने काढलेली छायाचित्रे इस्राेने ‘एक्स’वर पाेस्ट केली हाेती. मात्र, ते हटविले. ज्या दुसऱ्या खात्यावरुन हे फाेटाे शेअर करण्यात आले, ते नेमके काेणाचे आहे, याबाबत संभ्रम हाेता. मात्र, ते चंद्रयान-३ माेहिमेबाबत माहिती देण्यासाठी सुरु केलेले स्वतंत्र खाते असल्याचे स्पष्ट झाले. इस्राेचे खाते व्हेरिफाईड आहे तर, हे खाते नाही.