भारतात पहिल्यांदाच दिसले तपकिरी तिबेटी अस्वल; IFS अधिकाऱ्याने दिली माहिती...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 03:34 PM2024-01-15T15:34:23+5:302024-01-15T15:36:03+5:30
हे अतिशय दुर्मिळ अस्वल असून पहिल्यांदाच भारतात आढळले आहे. जाणून घ्या माहिती...
Rare Tibetan Brown Bear : भारतामध्ये काळ्या रंगाचे आणि अंगावर लांब केस असलेले अस्वल आढळते. तुमच्यापैकी अनेकांनी हे अस्वल पाहिले असेल. मात्र भारतात पहिल्यांदाच दुर्मिळ असणारे तपकिरी रंगाचे तिबेटी अस्वल (Rare Tibetan Brown Bear) दिसले आहे. सिक्कीम वन विभाग आणि डब्ल्यूडब्ल्यूएफ-इंडियाच्या कॅमेऱ्यांनी सिक्कीमच्या डोंगराळ भागात या दुर्मिळ प्रजातीच्या अस्वलाचे छायाचित्र टिपले आहे. भारतीय वन सेवेचे अधिकारी परवीन कासवान (IFS Parveen Kaswan) यांनी त्या अस्वलाचे फोटो शेअर केले आहेत.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर फोटो शेअर करताना IFS अधिकाऱ्याने लिहिले की, 'तुम्ही दुर्मिळ तिबेटी तपकिरी अस्वलाचा पहिला फोटो पाहत आहात. यासह भारतीय वन्यजीवांमध्ये आणखी एका उपप्रजातीची भर पडली आहे. सिक्कीम वन विभाग आणि WWF यांच्या संयुक्त प्रयत्नाने सिक्कीमच्या उंच भागात या प्राण्याचा शोध घेण्यात आला. याचाच अर्थ भारताचा बराचसा भाग अजूनही शोधायचा बाकी आहे.'
You are seeing first ever picture of rare Tibetan Brown Bear from #India. With this one more sub-species added to the Indian #biodiversity. This rare animal is documented in higher reaches of Sikkim with the joint effort of #Sikkim FD and WWF. So much India yet to be explored. pic.twitter.com/NvMohtXxjT
— Parveen Kaswan, IFS (@ParveenKaswan) January 15, 2024
या भागात आढळते
मिळालेल्या माहितीनुसार, पुचुंग ल्चेनपा, मंगन जिल्ह्यातील उंच भागात कॅमेरे बसवण्यात आले होते. या कॅमेऱ्यांनी डिसेंबर 2023 मध्ये रात्रीच्या अंधारात या अस्वलाचे फोटो टिपले. हे अस्वल चेहरा, राहणीमाण आणि इतर बाबतीत हिमालयात आढळणाऱ्या काळ्या अस्वलापेक्षा वेगळे आहे. हे अस्वल अल्पाइन जंगलात, गवताळ प्रदेशात आढळते आणि वनस्पती खाऊन जगते.
निळे अस्वल म्हणूनही ओळखले जाते
तिबेटी तपकिरी अस्वलाला तिबेटी निळे अस्वलदेखील म्हणतात. हे जगातील अस्वलाच्या दुर्मिळ उपप्रजातींपैकी एक आहे. हे अस्वल भारतात पहिल्यांदाच पाहायला मिळाले आहे. नेपाळ, भूतान आणि तिबेटच्या पठारावर हा अनेकवेळा दिसून येते. दक्षिण आशियातील पश्चिम हिमालय, काराकोरम, हिंदुकुश, पामीर, पश्चिम कुनलुन शान आणि तियान शान पर्वतरांगांमध्येही या अस्वलाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.