बांग्लादेशी खासदाराची कोलकात्यात निर्घृण हत्या; जवळच्या मित्रानेच दिली 5 कोटींची सुपारी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 02:18 PM2024-05-23T14:18:59+5:302024-05-23T14:19:42+5:30
बांग्लादेशी खासदार अन्वारुल अनवर यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे.
Bangladesh MP Anwarul Azim Anwar Death : बांगलादेशी खासदार अन्वारुल अझीम अन्वर यांच्या हत्या प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. पश्चिम बंगाल सीआयडीने गुरुवारी सांगितले की, खासदार अन्वारुल यांच्या मित्रानेच हत्येसाठी 5 कोटी रुपयांची सुपारी दिली होती. दरम्यान, अन्वारुल 13 मे रोजी पश्चिम बंगालच्या कोलकाता येथून अचानक बेपत्ता झाले होते. काही दिवसांनी पोलिसांना त्यांची हत्या झाल्याचे समजले.
बांग्लादेशचे गृहमंत्री असदुझ्झमन यांनी बुधवारी(दि.22) आपल्या खासदाराच्या हत्येची माहिती दिली होती. सध्या पश्चिम बंगाल पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवला आहे. पश्चिम बंगाल सीआयडीचे आयजी अखिलेश चतुर्वेदी यांनी मीडियाला दिलेल्या माहितीनुसार, ही एक सुनियोजित हत्या होती. अन्वारुल यांच्या अमेरिकेत राहणाऱ्या जुन्या मित्राने हत्येसाठी 5 कोटी रुपयांची सुपारी दिली.
उपचारासाठी कोलकाता येथे आले
खासदार अन्वारुल आपल्या वैद्यकीय उपचारासाठी कोलकाता येथे आले होते. ते आपले मित्र गोपाल बिस्वास यांच्या घरी थांबले. 13 मे रोजी डॉक्टरांची अपॉईंटमेंट असल्याचे घरातून बाहेर पडले अन् परतलेच नाही. सहा दिवसांनंतर, म्हणजेच 18 मे रोजी गोपाल यांनी अन्वारुल बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. यानंतर पोलिसांना तपासादरम्यान कोलकात्याच्या बाहेरील न्यू टाऊनमध्ये असलेल्या एका आलिशान फ्लॅटमध्ये रक्ताचे डाग आढळून आले. यावरुन खासदाराचा खुन झाल्याचा संशय पोलिसांना आला. आता तपासादरम्यान पोलिसांनी दावा केलाय की, हा खुन अन्वारुल यांच्या मित्राच्या सांगण्याने करण्यात आला आहे.