पोलिसांकरवी 16 आदिवासी महिलांवर पाशवी बलात्कार
By admin | Published: January 8, 2017 06:29 PM2017-01-08T18:29:10+5:302017-01-08T18:30:36+5:30
राज्यात 16 आदिवासी महिलांवर बलात्काराची संतापजनक घटना मानवी हक्क आयोगानं उघड केली आहे.
ऑनलाइन लोकमत
छत्तीसगड, दि. 8 - राज्यात 16 आदिवासी महिलांवर बलात्काराची संतापजनक घटना मानवी हक्क आयोगानं उघड केली आहे. बस्तर आणि विजापूर जिल्ह्यात या अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. तसेच काही महिलांचं शोषण केल्याचंही वृत्त आहे.
छत्तीसगडमधल्या आदिवासीबहुल भागात गेल्या काही दिवसांपासून नक्षलवाद्यांचा उपद्रव वाढला असून, त्यांच्याशी लढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा फौजफाटा ठेवण्यात आला आहे. पण या पोलिसांकडूनच आदिवासी महिलांचं शोषण होत असल्याची माहिती समोर आली आहे.
विशेष म्हणजे महिलांवर बलात्काराच्या घटना राष्ट्रीय मानवी आयोगानेच निदर्शनास आणून दिल्या आहेत. तसेच या घटनांना सरकार जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. पोलिसांनी पेगदापल्ली, चिन्नागेलूर, पेद्दागेलूर, गुंडम आणि बर्गीचेरू गावांमधील आदिवासी महिलांवर अनन्वित अत्याचार केले आहेत.
या नराधम पोलिसांविरोधात 34 महिलांनी आयोगाकडे रीतसर तक्रार केली असून, 20 महिलांचे जबाब नोंदवले गेले आहेत. आदिवासी महिलांवर अत्याचारादरम्यान पोलिसांनी एससी, एसटी कायद्याचंही उल्लंघन केल्याचा ठपका आयोगानं ठेवला आहे. राष्ट्रीय मानवी आयोगानं छत्तीसगड सरकारकडून या प्रकरणावर स्पष्टीकरण मागितलं आहे.