पुनर्विकासासाठी अनोखी शक्कल; पूरग्रस्त गावांना मिळणार अंबानी, अडाणी आणि टाटांचे नाव?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2019 03:58 PM2019-08-15T15:58:08+5:302019-08-15T16:08:01+5:30
पूरग्रस्त गावाच्या विकासासाठी कर्नाटक सरकारकडून निधी जमा करण्याचं काम सुरु आहे.
बंगळुरु - पुरामुळे कर्नाटकातील अनेक गावांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री बी. एस येडियुरप्पा यांनी अनोखी शक्कल लढवली आहे. ज्याची चर्चा सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात सुरु आहे. सीएम येडियुरप्पा यांनी बुधवारी घोषणा केली की, जी कंपनी पूरग्रस्त गावाच्या पुनर्विकासासाठी 10 कोटी रुपये देईल त्या गावाचं नाव कंपनीच्या नावावर ठेवलं जाईल.
पूरग्रस्त गावाच्या विकासासाठी कर्नाटक सरकारकडून निधी जमा करण्याचं काम सुरु आहे. मुसळधार पावसामुळे कर्नाटकातील जवळपास 22 जिल्ह्यातील गावांना पुराचा फटका बसला आहे. पुरामुळे 200 गावातील लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आलं. त्यामुळे या सर्व गावांच्या पुनर्विकासाचा प्रश्न कर्नाटक सरकारला पडला आहे. मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी कमीत कमी 60 उद्योगपतींची यासाठी भेट घेतली आहे.
मुख्यमंत्री कार्यालयाकडून जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे की, मदत आणि पुर्नवसनाचं काम करण्यासाठी ज्या गावाला कंपनी पैसे देईल ते गाव कंपनीने दत्तक घेतलं असं मानलं जाईल. आत्तापर्यंत विविध संस्थांकडून मुख्यमंत्र्यांकडे 4 कोटी रुपये मदत प्राप्त झाली आहे. कर्नाटक सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे सोशल मीडियावर लोकांनी आता कर्नाटकातील गावांची गावं अंबानी, अडाणी आणि टाटा ठेवली जातील असं म्हटलं आहे.
कर्नाटकात आलेल्या पुरामुळे आजपर्यंत 61 लोकांचा मृत्यू झाला आहे. पाण्याची पातळी कमी झाली असली तरी अनेक गावांना अद्यापही धोका कायम आहे. एनडीआरएफ आणि लष्कराद्वारे करण्यात येणाऱ्या बचावकार्यात 6 लाख 98 हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आलं आहे.
56 हजारपेक्षा अधिक घरांचे नुकसान
राज्यात पूरगस्तांसाठी 1 हजार 160 निवारा केंद्र बनविण्यात आली आहेत. चार लाख लोकांना स्वच्छ पाणी, जेवण आणि अन्य सामान देण्याची व्यवस्था केली आहे. सरकारी माहितीनुसार 22 जिल्ह्यातील 103 तालुक्यांना मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराचा फटका बसला आहे. घरांसोबत पिकांचे नुकसान झाले आहे. 4.58 लाख हेक्टर क्षेत्रातील कृषी आणि बागायत शेतीचे नुकसान झाले आहे.