१४ महिन्यांपूर्वी सत्ता सोडणारे पुन्हा 'सिंहासना'वर, येडियुरप्पांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2019 06:36 PM2019-07-26T18:36:30+5:302019-07-26T18:36:47+5:30
मोठ्या राजकीय उलथापालथीनंतर येडियुरप्पांनी मुख्यमंत्रिपद
बंगळुरु: प्रचंड राजकीय उलथापालथीनंतर भाजपाचे वरिष्ठ नेते बी. एस. येडियुरप्पा यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तीनच दिवसांपूर्वी कर्नाटकमधील काँग्रेस-जेडीएस सरकार कोसळलं. यानंतर आज येडियुरप्पांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राजभवनात त्यांचा शपथविधी संपन्न झाला. राज्यपाल वजूभाई वाला यांनी त्यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. येडियुरप्पांनी चौथ्यांदा कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
Karnataka: BJP State President BS Yediyurappa takes oath as Chief Minister at Raj Bhavan in Bengaluru. pic.twitter.com/5tEFE8GnHN
— ANI (@ANI) July 26, 2019
कर्नाटकमधील काँग्रेस-जेडीएसचं सरकार बहुमत सिद्ध करु न शकल्यानं तीनच दिवसांपूर्वी कोसळलं. यानंतर आज येडियुरप्पांनी कर्नाटकचे २५ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. येडियुरप्पा यांना ३१ जुलैपर्यंत विधानसभेत बहुमत सिद्ध करावं लागेल. कर्नाटक विधानसभेतील सध्याची सदस्य संख्या २२२ इतकी आहे. १७ बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यावर निर्णय घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत. त्यातील ३ आमदारांना कालच विधानसभा अध्यक्षांनी अपात्र ठरवलं. त्यामुळे आता १४ आमदारांच्या राजीनाम्यावरील निर्णय प्रलंबित आहे.
येडियुरप्पांना विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी ११२ आमदारांचा पाठिंबा गरजेचा आहे. यामध्ये बंडखोर आमदारांची भूमिका महत्त्वाची असेल. विधानसभेत भाजपाचे १०५ आमदार आहेत. त्यामुळे बहुमत सिद्ध करताना भाजपाला काँग्रेस, जेडीएसच्या बंडखोर आमदारांची आवश्यकता भासेल. या आमदारांनी येडियुरप्पांच्या बाजूनं मतदान केल्यास किंवा बहुमत चाचणीवेळी अनुपस्थित राहिल्यास भाजपाला मदत होईल.