निकृष्ट जेवणाची तक्रार करणाऱ्या जवानावर बीएसएफचे आरोप
By Admin | Published: January 11, 2017 04:16 AM2017-01-11T04:16:10+5:302017-01-11T04:16:23+5:30
सीमेवर अहोरात्र रक्षण करणाऱ्या सैन्य दलातील जवानांना निकृष्ट आहार दिला जातो, अशी तक्रार करणाऱ्या तेज बहादूर यादव या जवानाचे आरोप फेटाळून
जम्मू : सीमेवर अहोरात्र रक्षण करणाऱ्या सैन्य दलातील जवानांना निकृष्ट आहार दिला जातो, अशी तक्रार करणाऱ्या तेज बहादूर यादव या जवानाचे आरोप फेटाळून लावतानाच, तो दारूबाज आहे, तो मनोरुग्ण आहे, त्याच्यावर २०१० मध्ये कोर्ट मार्शलची प्रक्रिया केली होती. तो मुजोर आहे, त्याला आधी कारावासाची शिक्षा सुनावली होती, अशी माहिती मंगळवारी बीएसएफच्या वतीने देण्यात आली. मात्र त्याच्या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी दिले आहेत.
तेज बहादूर यादव नावाच्या या जवानाने निकृष्ट जेवणाची तक्रार करणारा व्हिडीओ प्रसारित करताच, संपूर्ण देशात खळबळ माजली. त्याच्या तक्रारींची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी सर्व स्तरांतून सुरू झाली. बीएसएफने मात्र त्याचे आरोप अमान्य करताना, त्याच्याविषयीच्या तक्रारींचा पाढा वाचला. त्यावर मी इतका वाईट आहे, तर मला आतापर्यंत चांगल्या कामाबद्दल पदके का देण्यात आली, असा सवाल तेजबहादर यादव याने केला. जवानाने स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केला असून ३१ जानेवारीला तो सेवेतून निवृत्त होणार आहे.
त्याने तक्रारी वरिष्ठांपुढे करायला हव्या होत्या, असे बीएसएफतर्फे सांगण्यात आले. मात्र आपण वरिष्ठांकडे तक्रारी केल्या होत्या. त्यांची दखल घेतली नाही, असे त्याने सांगितले. आता मात्र त्याच्या तक्रारींची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार असल्याचेही सैन्य दलाकडून सांगण्यात आले.
आम्ही ११ तास सीमेवर पहारा देतो आणि आम्हाला भोजनात काय मिळते तर फक्त हळद व मीठ असलेले वरण, असा आरोप या जवानाने केला होता. तो आरोप खोडून काढताना या जवानाचे अधिकाऱ्यावर बंदूक रोखल्याप्रकरणी सहा वर्षांपूर्वी कोर्ट मार्शल केले होते, असे बीएसएफतर्फे सांगण्यात आले. बीएसएफचे महानिरीक्षक डी. के. उपाध्याय म्हणाले की बीएसएफने हे आरोप अत्यंत गांभीर्याने घेतले आहेत. पण, हा जवान ज्या ठिकाणी कार्यरत आहे त्या ठिकाणच्या अन्य जवानांनी आहाराबाबत काहीही तक्रार केलेली नाही. डीआयजी दर्जाच्या दोन अधिकाऱ्यांनी या शिबिरात नुकतीच भेट दिली होती. त्यांना कोणतीही तक्रार मिळाली नाही. (वृत्तसंस्था)