पंतप्रधान मोदींचा 'अनादर' केला म्हणून BSF जवानाचा पगार कापला!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2018 10:42 AM2018-03-07T10:42:23+5:302018-03-07T10:42:23+5:30
सीमेवर धडाकेबाज पराक्रम करणारं सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) यावेळी पुन्हा एकदा वेगळ्या कारणामुळे चर्चेत आलं आहे.
नवी दिल्ली - सीमेवर धडाकेबाज पराक्रम करणारं सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) यावेळी पुन्हा एकदा वेगळ्या कारणामुळे चर्चेत आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना योग्य सन्मान, आदर न दिल्याबद्दल बीएसएफ अधिकाऱ्यांनी एका जवानाचा सात दिवसांचा पगार कापलाय. या अजब शिक्षेबद्दल जवानांमध्ये नाराजीचा सूर उमटतोय.
21 फेब्रुवारीला बीएसएफच्या 15व्या तुकडीच्या मुख्यालयात झीरो परेड सुरू होती. त्यावेळी जवान संजीव कुमार यांनी एक रिपोर्ट देताना अनवधानाने 'मोदींचा कार्यक्रम' असा उल्लेख केला होता. तो ऐकून कमांडिंग ऑफिसर अनूप लाल भगत चिडले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाआधी 'माननीय' किंवा 'श्री' न वापरल्याबद्दल संजीव कुमारांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले होते. त्यानंतर संजीव यांनी केलेल्या 'चुकी'बाबत सुनावणी झाली आणि बीएसएफ कायद्याच्या कलम 40 अन्वये त्यांना दोषी धरण्यात आलं. त्या अंतर्गतच त्यांचं सात दिवसांचं वेतन कापण्यात आलंय. ही शिक्षा जरा अतीच झाली, असं अनेक अधिकाऱ्यांचंही म्हणणं आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी बीएसएफ जवान तेज बहादूर यादव यांच्या व्हिडिओमुळे अधिकारी आणि सरकार संशयाच्या फेऱ्यात अडकलं होतं. बीएसएफ जवांनाना निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं जात असल्याची तक्रार तेज बहाद्दूर यांनी केली होती. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, आपला छळ सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. त्यावर चौकशी केल्यानंतर, तेज बहादूर यांना बडतर्फ करण्यात आलं होतं. त्यानंतर जवानांना मिळणाऱ्या सापत्न वागणुकीची आणखीही काही प्रकरणं समोर आली होती.