खळबळजनक! जम्मूमध्ये सीमेजवळ पुन्हा आढळला बोगदा; १० दिवसांतील दुसरी घटना
By देवेश फडके | Published: January 23, 2021 04:20 PM2021-01-23T16:20:33+5:302021-01-23T16:22:14+5:30
जम्मू काश्मीरमधील हीरानगर भागात असलेल्या पानसर येथे सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना आणखी एक बोगदा सापडला आहे. गेल्या दहा दिवसांत दुसरा बोगदा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
जम्मू : जम्मू काश्मीरमधील हीरानगर भागात असलेल्या पानसर येथे सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना आणखी एक बोगदा सापडला आहे. गेल्या दहा दिवसांत दुसरा बोगदा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. नव्याने आढळलेल्या बोगद्याची लांबी सुमारे १५० मीटर असून, याची निर्मिती भारतात घुसखोरीसाठी करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांकडून या बोगद्याची निर्मिती करण्यात आली होती. याचा वापर दहशतवाद्यांना भारतात घुसखोरीसाठी करण्याची योजना होती, असेही सांगितले जात आहे. यासंदर्भात अधिक तपास केला जात आहे.
BSF detects another tunnel in the area of Pansar, Jammu today. The tunnel is approx 150 meters long and 30 feet deep. It is pertinent to mention here that BSF had shot down a Pakistani Hexacopter carrying load of weapons & ammunition in June 2020 in the same area: BSF https://t.co/0JA2WK1JTmpic.twitter.com/3PTBb46iI4
— ANI (@ANI) January 23, 2021
गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एका विशेष शोधमोहीम सुरू असून, याअंतर्गत जम्मूमधील पानसेर येथे आणखी एक बोगदा आढळला आहे. बीपी नंबर १४ व १५ दरम्यान हा बोगदा आढळून आला असून, हा बोगदा सुमारे १५० मीटर लांब व ३० फूट खोल आहे, असे लष्करी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
गेल्या सहा महिन्यातील चौथा बोगदा
आतापर्यंत जम्मू परिसरात दहाव्यांदा आणि मागील सहा महिन्यांमध्ये चौथ्यांदा बोगदा आढळून आला आहे. भारतीय जवानांनी नोव्हेंबर २०१९ मध्ये याच क्षेत्रातील घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला होता. सीमा सुरक्षा दलाने जून २०२० मध्ये याच भागात शस्त्र आणि स्फोटके घेऊन जाणारे एक पाकिस्तानी हेक्साकॉप्टरला पाडले होते, असेही लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले.
पाकिस्तानी छावणी केवळ ४०० मीटरवर
गतवर्षीच्या ऑगस्ट महिन्यातही सीमा सुरक्षा दलाला अशाच प्रकारचा एक बोगदा आढळला होता. जम्मू-काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात असलेल्या बेंगालड भागात २५ फूट खोल आणि १५० मीटर लांबीचा बोगदा आढळून आला होता. त्या बोगद्यांपासून पाकिस्तानी लष्कराची चौकी ४०० मीटर अंतरावर होती. तसेच या भूयारी मार्गाबरोबरच शक्करगढ, कराची लिहिलेल्या काही वाळूच्या पिशव्याही तिथं सापडल्या होत्या, असे भारतीय लष्करी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले होते.