BSFने मोठा कट उधळला; PM नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी पंजाबमध्ये मोठा शस्त्रसाठा जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 03:19 PM2022-08-23T15:19:33+5:302022-08-23T15:19:42+5:30
सीमा सुरक्षा दलाने भारत-पाक सीमेवर मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे.
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या पंजाब दौऱ्याच्या एक दिवस अगोदर सीमा सुरक्षा दलाने (BSF) मंगळवारी भारत-पाक सीमेवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त केला. राजा मोतम आणि बीओपी जोगिंदर यादरम्यान हा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. जप्त केलेली ही शस्त्रे पाकिस्तानातून आणल्याचा संशय आहे.
सीमा सुरक्षा दलाने पंजाबमधील भारत-पाकिस्तान सीमेवर गस्तीदरम्यान सीमेपलीकडून तस्करी केलेल्या शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. पहाटे, सीमा सुरक्षा जवानांनी फिरोजपूर सेक्टरमधून पहाटे तीन AK सिरीज रायफल्ससह सहा मॅगझिन, दोन एम 3 सब-मशीन गन आणि दोन मॅगझिन जप्त केल्या. या शस्त्रास्त्रांची पाकिस्तानातून तस्करी करण्यात आल्याची माहिती आहे.
नरेंद्र मोदींचा पंजाब दौरा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. पंतप्रधान 24 ऑगस्ट रोजी मुल्लानपूर, मोहाली येथे होमी भाभा कर्करोग रुग्णालय आणि संशोधन केंद्राचे उद्घाटन करण्यासाठी पंजाबमध्ये येत आहेत. पंतप्रधान मोदींच्या मोहाली दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पंजाब पोलिसांनी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. प्रत्येक वाहनांची तपासणी केली जात आहे.