दोन महिला कॉन्स्टेबलचा BSF महिनाभरापासून घेतंय शोध, या कारणामुळे सुरक्षा यंत्रणांचं वाढलंय टेंन्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2024 15:08 IST2024-07-07T15:07:58+5:302024-07-07T15:08:26+5:30
BSF Women Constables: ग्वाल्हेरमधील टेकनपूर येथे बीएसएफच्या अकादमीमधून एक महिन्यापासून बेपत्ता असलेल्या दोन महिला कॉन्स्टेबलचा शोध अनेक यंत्रणांकडून घेतला जात आहे. आंतरराष्ट्रीय सीमांवर बीएसएफच्या यंत्रणांना सतर्क करण्यात आलं आहे.

दोन महिला कॉन्स्टेबलचा BSF महिनाभरापासून घेतंय शोध, या कारणामुळे सुरक्षा यंत्रणांचं वाढलंय टेंन्शन
ग्वाल्हेरमधील टेकनपूर येथे बीएसएफच्या अकादमीमधून एक महिन्यापासून बेपत्ता असलेल्या दोन महिला कॉन्स्टेबलचा शोध अनेक यंत्रणांकडून घेतला जात आहे. आंतरराष्ट्रीय सीमांवर बीएसएफच्या यंत्रणांना सतर्क करण्यात आलं आहे. जबलपूरमध्ये राहणारी आकांक्षा निखार आणि बंगालमधील मुर्शिदाबाद येथे राहणारी शाहना खातून २०२१ पासून अकादमीमध्ये प्रशिक्षक होत्या. ६ जून २०२४ रोजी त्या बेपत्ता झाल्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अधिकाऱ्यांना दोन्ही कॉन्स्टेबलच्या फोनमध्ये संशयास्पद हालचाली दिसून आल्यानंतर याबाबतच्या तपासाला वेगळं वळण लागलं आहे. तसेच रेकॉर्डमधून त्यांच्या फोनचं लोकेशन हे दिल्ली, हावडा आणि पश्चिम बंगालमधील बेहरामपूर येथे दाखवण्यात आलं होतं.
या दोन्ही महिला कॉन्स्टेबलचा शोध घेण्यासाठी अधिकारी अनेक ठिकाणांवरून फोन रेकॉर्ड आणि सीसीटीव्ही फुटेजचा तपास करण्यासह विविध राज्यांमध्ये त्यांनी केलेल्या प्रवासामागच्या कारणांचा तपास केला जात आहे. तसेच दोन्ही कॉन्स्टेबल आणि पश्चिम बंगालमधील शाहना कुटुंबीयांमध्ये काही संबंध आहे की नाही याचाही शोध घेतला जात आहे. ७ जून रोजी बेहरामपूरमधील बीकन रुग्णालयाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्या दिसल्या होत्या. रुग्णालयातून बाहेर पडल्यापासून त्यांचे फोन बंद आहेत. दरम्यान, बेपत्ता असलेस्या कॉन्स्टेबल आकांक्षा निखार यांची आई उर्मिला निखार यांनी ग्वाल्हेर पोलिसांसोबतच्या जनसुनावणीदरम्यान, चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी अधिकाऱ्यांना ५ जून रोजी आकांक्षासोबत झालेल्या संभाषणाची माहिती दिली. तसेच त्यामध्ये ती काहीशी घाबरलेली दिसल्याचं सांगितलं.
उर्मिला निखार यांनी आरोप केला की, ग्वाल्हेर पोलिसांनी ६ जून रोजी बिलुआ पोलीस ठाण्यामध्ये बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. मात्र तपास केला गेला नाही. बंगालमध्ये शहाना हिच्या नातेवाईकांनी निखार हिला कुठलीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे या प्रकरणातील गुढ वाढत आहे. आकांक्षा यांनी दिलेल्या तक्रारीनंतर ग्वाल्हेर पोलिसांनी एका विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. या महिला कॉन्स्टेबलचा शोध घेण्यासाठी पोलीस अधिकारी बंगालमध्ये आपल्या समकक्षांसह राज्य आणि केंद्रीय यंत्रणांची मदत घेत आहे.