सूर्य कोपला! राजस्थानमध्ये उष्णतेची लाट; जवानानं पापड भाजून दाखवला, नेटकरी गहिवरले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 04:26 PM2024-05-22T16:26:50+5:302024-05-22T16:35:48+5:30
भीषण गर्मी आणि उन्हाचा कहर पाहायला मिळत आहे.
सध्या देशातील विविध राज्यांमध्ये भीषण गर्मी आहे. उष्णतेली लाट पाहता अनेक राज्यांमध्ये दुपारच्या वेळेस शक्यतो घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला जात आहे. भीषण गर्मी आणि उन्हाचा कहर पाहायला मिळत आहे. याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशातच सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) जवानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून राजस्थानमधील बिकानेरमध्ये असलेल्या उन्हाची तीव्रता तुम्ही अनुभवू शकता. खरे तर या जवानाने रेतीत पापड ठेवला असता अवघ्या काही वेळात तो जवळपास ७० टक्के भाजून निघाला.
काही मिनिटांतच पापड भाजून निघाल्याने बिकानेर येथे उन्हाची तीव्रता काय आहे याची कल्पना करू शकता. पण, एवढ्या कडक उन्हात देखील आपल्या रक्षणासाठी भारतीय जवान तैनात असल्याचे पाहून अनेकांनी त्यांच्या देशसेवेला दाद दिली. कमेंटच्या माध्यमातून नेटकरी जवानांच्या कार्याला सलाम करत आहेत. राजस्थानमधील बिकानेर येथे तब्बल ४७ सेल्सिअस इतके तापमान आहे. BSF जवानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. नेटकरी कमेंटच्या माध्यमातून देशसेवा करणाऱ्या जवानांच्या कार्याचे कौतुक करताना दिसत आहेत.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया...
भारतीय जवानाच्या कार्याला सलाम करताना एकाने म्हटले की, भारतीय जवानांचे कौतुक करण्यासाठी शब्द देखील अपुरे पडतील. तर, जवानांचे जीवन खूप कठीण आणि संघर्षमय असते. त्यांच्या या देशसेवेसाठी कडक सॅल्युट, असे एका युजरने कमेंटच्या माध्यमातून म्हटले.
Salute to Our Jawans
— Frontalforce 🇮🇳 (@FrontalForce) May 22, 2024
BSF Jawan roasting a papad in sand in Bikaner, Rajasthan along IB serving motherland in such heat.pic.twitter.com/FV4Mi7hJra
दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (IMD) भारतातील बहुतांश भागात २५ मे पर्यंत तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्याने जोधपूर आणि बिकानेरसाठी उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी केला आहे. तर राजस्थानातीलच पिलानी येथे पुढील २८ तासांत ४८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद होऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.