बीएसएफ जवान तेज बहाद्दूर यांचे मोदींविरोधात लढण्याचे स्वप्न भंगले; उमेदवारी रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2019 02:45 PM2019-05-01T14:45:23+5:302019-05-01T15:52:55+5:30
वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्यासमोर आव्हान उभे करण्यासाठी सपा-बसपा महाआघाडीने मोठी खेळी खेळली होती.
वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात उभे राहिलेले बडतर्फ जवान तेज बहाद्दूर यांची उमेदवारीच नाट्यमय घडामोडीनंतर रद्द करण्यात आली आहे. यामुळे सपा-बसपाच्या गोटातही खळबळ उडाली आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांना लष्कराकडून प्रमाणपत्र देण्याची नोटीस बजावली होती. यावर तेज बहादूर यांनी दोन्ही नोटिसांना उत्तरे दिली, मात्र उमेदवारी दाखल केल्यापासून घाबरलेल्या पंतप्रधान मोदी यांनी अडचणी निर्माण केल्याचा आरोप तेज बहादूर यांनी केला.
वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्यासमोर आव्हान उभे करण्यासाठी सपा-बसपा महाआघाडीने मोठी खेळी खेळली आहे. सपा-बसपा महाआघाडीने वाराणसी येथील आपला उमेदवार बदलताना बीएसएफ जवान तेज बहादूर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तेज बहादूर आणि आणि आधीच्या उमेदवार शालिनी यादव यांनी समाजवादी पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र नरेंद्र मोदींसमोर तेज बहादूर हेच उमेदवार असतील. तसेच शालिनी यादव या उमेदवारी अर्ज मागे घेतील, असे समाजवादी पक्षाने स्पष्ट केले होते. या मतदारसंघात काँग्रेसने अजय राय यांना उमेदवारी दिली आहे.
निवडणूक अधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी तेजबहाद्दूर यांना नोटीस देत संरक्षण मंत्रालयाकडून प्रमाणपत्र आणण्यास सांहितले होते. यासाठी बुधवारी दुपारी 11 वाजेपर्यंतची वेळ दिली होती. त्यांना दोन नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या. आज सकाळी 11 वाजता तेज बहाद्दूर यादव त्यांच्या वकिलांसोबत निवडणूक अधिकाऱ्यांना भेटायला गेले होते.
निवडणूक अधिकाऱ्यांनी तेज बहाद्दूर यांचा अर्ज रद्द केला. आता शालिनी यादव सपाकडून मोदींविरोधात उभ्या राहणार आहेत. यावेळी तेज बहाद्दूर समर्थक आणि पोलिसांदरम्यान जोरदार वादवादी झाली. त्यानंतर पोलिसांनी समर्थकांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातून बाहेर काढले.
हरयाणाचे रहिवासी असलेले तेज बहादूर यांनी वाराणसी मतदारसंघातून नरेंद्र मोदींविरोधात निवडणूक लढण्याची घोषणा केली होती. सुरुवातीला ते अपक्ष निवडणूक लढवणार होते. मंगळवारी उमेदवारी अर्जाची छाननीवेळी त्यांच्या दोन अर्जांमध्ये बीएसएफमधून बडतर्फ करण्याबाबत वेगवेगळी माहिती दिल्यावर आक्षेप घेण्यात आला होता. यानंतर जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी सुरेंद्र सिंह यांनी तेज बहादूर यांना नोटिस पाठवून 24 तासांच्या आत बीएसएफचे नाहरकत प्रमाणपत्र घेऊन येण्यास सांगितले होते.
Samajwadi Party MP candidate from Varanasi, Tej Bahadur Yadav: My nomination has been rejected wrongly. I was asked to produce the evidence at 6.15pm yesterday, we produced the evidence, still my nomination was rejected. We will go to the Supreme Court. pic.twitter.com/MF05gNoLJq
— ANI UP (@ANINewsUP) May 1, 2019
2017 मध्ये तेज बहाद्दूर यादव यांनी बीएसएफमध्ये दर्जाहीन जेवण देत असल्याचे काही व्हिडिओ सोशल मिडियावर टाकत सैन्य दलातील भ्रष्टाचार उघड केला होता. यावेळी ते भारत-पाकिस्तानच्या सीमेवर तैनात होते. मंडी मंदिर मुख्यालयातील 29 व्या बटालियनमध्ये ते कॉन्टेबल या पदावर होते. त्यांची नियुक्ती पूंछ जिल्ह्यातील खेत येथील एलओसीवर झाली होती. तेज बहादूर यांचे प्रकरण खूप गाजले होते. गेल्या वर्षी बीएसएफ जवान तेज बहाद्दूर यादव यांच्या व्हिडिओमुळे अधिकारी आणि सरकार संशयाच्या फेऱ्यात अडकलं होतं. बीएसएफ जवांनाना निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात असल्याची तक्रार तेज बहाद्दूर यांनी केली होती. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, आपला छळ सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. त्यावर चौकशी केल्यानंतर, तेज बहादूर यांना बडतर्फ करण्यात आले होते. त्यानंतर जवानांना मिळणाऱ्या सापत्न वागणुकीची आणखीही काही प्रकरणं समोर आली होती. बहादूर यांच्याकडे दोन मोबाईल बाळगल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. तसेच सैन्याच्या गणवेशात असताना सोशल मिडियावर फोटो टाकल्याने सैन्याचे नियम तोडल्याचा आरोप ठेवत त्यांना बडतर्फ करण्यात आले होते.