Republic Day 2018 : प्रजासत्ताक दिनी सीमेवर जवान पाकला करणार नाहीत मिठाई वाटप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2018 01:45 PM2018-01-26T13:45:35+5:302018-01-26T13:59:14+5:30
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं सीमेवर बीएसएफचे जवान यंदा पाकिस्तानला मिठाई वाटप करणार नाहीत. दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर सीमेवर भारताकडून पाकिस्तानच्या सैन्याला मिठाई दिली जाते.
श्रीनगर- प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं सीमेवर बीएसएफचे जवान यंदा पाकिस्तानला मिठाई वाटप करणार नाहीत. दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर सीमेवर भारताकडून पाकिस्तानच्या सैन्याला मिठाई दिली जाते. परंतु यंदा ते मिठाई वाटप करणार नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
बीएसएफने यंदा पाकिस्तानी रेंजर्सना मिठाई न वाटण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून सीमेवर पाकिस्तानी सैन्याच्या कुरघोडी सुरू आहेत. अनेकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात येतो. आतापर्यंत नियंत्रण रेषेवर गोळीबार होत होता. परंतु पाकिस्ताननं आंतरराष्ट्रीय सीमा रेषेवरही शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळेच भारतीय जवानांनी यंदा पाकिस्तानला मिठाई न देण्याचा निर्णय घेतला आहे. भारत-पाकिस्तान सीमेवरील वाढणारा तणाव दूर करण्यासाठी 25 जानेवारी रोजी पाकिस्तानी रेंजर्स आणि बॉर्डर सिक्युरिटी फोर्स यांच्यादरम्यान एक बैठक झाली होती. पाकिस्तानच्या विनंतीनंतर या बैठकीत दोन्ही देशांचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.
पाकिस्तानकडून वारंवार होत असलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाला भारतीय लष्कर चोख प्रत्युत्तर देत असतं. पूंछ सेक्टरमध्ये भारताने केलेल्या गोळीबारात 7 पाकिस्तानी सैनिक ठार झाले होते, तर चार सैनिक जखमी झाल्याची माहिती समोर आली होती. नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन होतं. याच्याविरोधात भारताने कारवाई केली होती.
सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती वाढल्या आहेत. सोमवारी भारतीय सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानी सैन्याला सडेतोड प्रत्युत्तर दिलं होतं. पाकिस्तानमधील पूंछ सेक्टर येथील पाकिस्तानी सैन्याच्या चौक्यांवर भारतीय सैन्याने गोळीबार केला जातो. यात पाकचे सात जवान ठार झाले होते. घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या ‘जैश- ए- मोहम्मद’च्या सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याची घटना ताजी असतानाच भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्यालाही दणका दिला आहे.