पंजाबच्या तरनतारनमध्ये बीएसएफने पाकिस्तानी ड्रोन पाडले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2019 11:51 AM2019-04-04T11:51:39+5:302019-04-04T15:31:07+5:30
पाकिस्तानच्या सीमारेषेवरील कुरापती सुरूच आहेत. पंजाबच्या तरनतारनमधील खेमकरन सेक्टच्या बीओपी अर्थात बॉर्डर आऊट पोस्टमध्ये बीएसएफने एक पाकिस्तानी ड्रोन पाडले आहे.
तरनतारन - पाकिस्तानच्या सीमारेषेवरील कुरापती सुरूच आहेत. पंजाबच्या तरनतारनमधील खेमकरन सेक्टच्या बीओपी अर्थात बॉर्डर आऊट पोस्टमध्ये बीएसएफने एक पाकिस्तानी ड्रोन पाडले आहे. सीमेजवळील भारताच्या हद्दीतील रतोके गावात एक पाकिस्तानी ड्रोन दिसला होता. त्यावर तातडीने कारवाई करत बीएसएफने एअर स्ट्राईक गनने हे ड्रोन पाडले आहे.
सरपंच लखबीर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी स्वत: हा ड्रोन पाहिला होता. रात्री झालेल्या गोळीबारानंतर जवळच्या काही गावांमध्ये ब्लॅक आऊट करण्यात आला. तसेच गावातील इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली होती. भारतीय सीमेत पाकिस्तानातील ड्रोन घुसण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही राजस्थानातही पाकिस्तानी ड्रोन घुसल्याची माहिती मिळाली होती. परंतु, भारतीय जवानांनी हे ड्रोन पाडले होते.
भारताने पाडले टेहळणी करणारे पाकिस्तानचे ड्रोन, दुसऱ्यांदा प्रयत्न फसला
राजस्थानमधील बिकानेर क्षेत्रात सीमेलगत भारतीय हवाई दलाच्या सुखोई-30 या विमानाने काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे टेहळणी करणारे एक लष्करी ड्रोन पाडले. यासाठी हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र डागण्यात आले होते. हा ड्रोन विमान भारतीय हद्दीत आल्याचा सुगावा रडार यंत्रणेमुळे सैन्यदलाला लागला होता. पाकिस्तानने भारतीय हद्दीत दुसऱ्यांदा ड्रोन पाठवून टेहळणी करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. या आधी भारतीय हद्दीत कच्छ परिसरात 27 फेब्रुवारी रोजी शिरलेले पाकिस्तानी ड्रोनही हवाई दलाने पाडले होते.
पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत व पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला आहे. भारतीय हवाई दलाच्या विमानांनी हल्ला चढवून पाकिस्तानच्या बालाकोट येथील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. त्यानंतर पाकिस्ताननेही भारतावर हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. काश्मीरमधील कारवायांबरोबरच पाकिस्तानने राजस्थान, गुजरातच्या सीमाभागातही भारताविरोधात हालचाली सुरू ठेवल्या आहेत. त्यावर हवाई दलाने करडी नजर ठेवलेली आहे.
टेहळणी करणारे ड्रोन पाडल्याचा पाकचा दावा भारताने फेटाळला
बाघ क्षेत्रामध्ये नियंत्रण रेषेजवळ टेहळणी करणारे भारताचे ड्रोन विमान (क्वाडकॉप्टर) पाडल्याचा पाकिस्तानी लष्कराने केलेला दावा भारताने फेटाळून लावला होता. ड्रोनचे छायाचित्र पाकिस्तानी लष्कराच्या आंतरदलीय जनसंपर्क विभागाचे महासंचालक मेजर जनरल असिफ गफूर यांनी ट्विटरवर अपलोड केले होते. तसेच त्यांनी आमच्या हद्दीत भारताच्या जवानांनाच नव्हे, तर त्यांचे ड्रोनही येऊ दिले जाणार नाही असं म्हटलं होतं. यासंदर्भात भारतीय लष्कराच्या सूत्रांनी नियंत्रण रेषेवर अशी कोणतीही घटना घडलेली नसल्याचं सांगितलं होतं.