सीमेवर वाढतेय मुस्लिमांची लोकसंख्या; BSF ने व्यक्त केली चिंता
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2018 12:36 PM2018-12-01T12:36:03+5:302018-12-01T12:49:21+5:30
राजस्थानमध्ये भारत-पाक सीमेवर असणाऱ्या जैसलमेर जिल्ह्यातील वाढत्या लोकसंख्येवरून सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) चिंता व्यक्त केली आहे. याबाबत केंद्रीय गृह मंत्रालयालाही माहिती देण्यात आली आहे.
नवी दिल्ली - राजस्थानमध्ये भारत-पाक सीमेवर असणाऱ्या जैसलमेर जिल्ह्यातील वाढत्या लोकसंख्येवरून सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) चिंता व्यक्त केली आहे. याबाबत केंद्रीय गृह मंत्रालयालाही माहिती देण्यात आली आहे. पाक सीमेवरील मुस्लिमांची वाढती लोकसंख्या चिंताजनक असल्याचं बीएसएफने म्हटलं आहे. सीमा सुरक्षा दलाच्या सर्वेक्षणानुसार, सीमा परिसरात मुस्लिमांची लोकसंख्या वाढत आहे. तसेच मुस्लिम समाजात धार्मिक कट्टरता वाढत असून पारंपरिक राजस्थानी ओळख मागे पडत चालली आहे. हिंदू आणि मुस्लिम समाजातील संवादही कमी होत चालला असल्याचं समोर आलं आहे.
सीमा सुरक्षा दलाने काही दिवसांपूर्वीच जैसलमेर भागात राहणाऱ्या लोकांचे सर्वेक्षण केले होते. त्यामध्ये अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. जैसलमेर परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या पेहरावात आणि केशरचनेत अमुलाग्र बदल होऊन त्यातून राजस्थानची छबी नाहीशी होत चालली आहे, असं धक्कादायक निरीक्षण सीमा सुरक्षा दलानं नोंदवलं आहे. तसेच सीमा भागातील मुस्लिम समाजाच्या लोकसंख्येत तब्बल 20 ते 22 टक्के वाढ झाली आहे. इतर धर्मियांची लोकसंख्या 8 ते 10 टक्क्यांनी वाढल्याचं सीमा सुरक्षा दलाच्या सर्वेक्षणात म्हटलं आहे.
सीमा सुरक्षा दलाने त्याच्या सर्वेक्षणात मुस्लिम समाजाच्या वाढत्या लोकसंख्येवरून या भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्यातरी या भागात धार्मिक तेढ नाही. परंतु, तेढ निर्माण होऊ नये, यासाठी खबरदारी घेणे आवश्यक असल्याचं म्हटलं आहे. मोहनगड, नचना आणि पोखरण येथे हिंदुत्त्ववादी संघटनांचे प्रमाण वाढले आहे. या संघटनांमध्ये स्थानिक हिंदू मोठ्या प्रमाणात सामील होत आहेत. यावर मुस्लीम समाजाचा आक्षेप आहे. मात्र, अद्याप यावरुन दोन्ही समाजात वाद झालेला नाही, असेही यात स्पष्ट करण्यात आले आहे. मोहनगड, नचना, बहला, पोखरण, साम, तनोट या भागांमध्ये सीमा सुरक्षा दलाने हे सर्वेक्षण केले आहे. त्याचा अहवाल केंद्रीय गृहमंत्रालयासह अन्य यंत्रणांना सुपूर्द करण्यात आला, अशी माहिती सीमा सुरक्षा दलाचे प्रमुख रजनीकांत मिश्रा यांनी दिली.