शेतात पुरुन ठेवले हेरॉईन; BSF आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईत 150 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2023 01:37 PM2023-06-12T13:37:32+5:302023-06-12T13:38:21+5:30
Punjab: सीमेपलीकडून ड्रग्स येत असून, बीएसएफला दोन तुटलेले ड्रोनही सापडले आहेत.
चंदीगड: पंजाब राज्याची सीमा पाकिस्तानला लागून असल्यामुळे राज्यात पाकमधून अनेकदा ड्रग्सचा मोठा साठा येत असतो. यातच आता सीमा सुरक्षा दलाने (BSF) अमृतसर सेक्टरमधील आंतरराष्ट्रीय सीमेजवळील शेतात पुरून ठेवलेली अंमली पदार्थांची दोन पाकिटे जप्त केली आहेत. याशिवाय बीएसएफने या सेक्टरमध्ये तुटून पडलेले एक ड्रोनही जप्त केले आहे.
बीएसएफच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, गुप्त माहितीच्या आधारे 11 जून रोजी एका संशयित शेतकऱ्याला भरोपाल गावातून ताब्यात घेतले होते. बीएसएफने पंजाबपोलिसांकडे त्याच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. चौकशी केली असता, शेतकऱ्याने सांगितले की, त्याने सीमेजवळ शेतात अंमली पदार्थांची पाकिटे लपून ठेवली आहेत. यानंतर बीएसएफला त्या ठिकाणी दोन पाकिटे सापडली.
याशिवाय, बीएसएफला अमृतसर जिल्ह्यातील सैदपूर कलान गावाच्या सीमेवर गावातील गुरुद्वाराजवळ एक ड्रोन तुटलेल्या अवस्थेत सापडला. हा ड्रोन डीजेआय मॅट्रिक्स 300 आरटीके क्वाडकोप्टर आहे. ड्रोन जप्त केल्यानंतर संपूर्ण परिसरात बीएसएफचे सर्च ऑपरेशन सुरू आहे. बीएसएफ आणि पंजाब पोलिसांच्या संयुक्त कारवाईत रविवारीही तरनतारन सेक्टरमधील राजोके गावातून एक तुटलेले ड्रोन जप्त करण्यात आले होते.
मोठी गोष्ट म्हणजे, गेल्या 10 दिवसांपासून पंजाब सीमेवर ड्रोनद्वारे हेरॉइनची खेप पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे. दहा दिवसांत, बीएसएफ आणि पंजाब पोलिसांनी ड्रोनमधून टाकलेले सुमारे 30 किलो हेरॉईन जप्त केले आहे, ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 150 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.