बीएसएफने टिपले १५ पाक सैनिक ! पाकच्या चौक्याही केल्या उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 05:50 AM2018-01-05T05:50:28+5:302018-01-05T12:06:46+5:30
भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी १ जानेवारीपासून पाकिस्तानच्या १५ सैनिकांचा खात्मा केला असून, गुरुवारी आंतरराष्ट्रीय सीमेवर घुसखोरीचा डाव उधळताना पाकिस्तानच्या दोन चौक्या व तोफांच्या मा-याचे तळ उद्ध्वस्त करून एका घुसखोराला ठार केले.
जम्मू - भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी १ जानेवारीपासून पाकिस्तानच्या १५ सैनिकांचा खात्मा केला असून, गुरुवारी आंतरराष्ट्रीय सीमेवर घुसखोरीचा डाव उधळताना पाकिस्तानच्या दोन चौक्या व तोफांच्या मा-याचे तळ उद्ध्वस्त करून एका घुसखोराला ठार केले.
बीएसएफच्या जवानांनी केलेल्या तडाखेबंद हल्ल्यात पाकिस्तानच्या हद्दीतील लष्करी सोयी-सुविधायुक्त ठाणे आणि शस्त्रे उद्ध्वस्त झाली. या हल्ल्यात पाकिस्तानी चौक्या उद्ध्वस्त करून पाकिस्तानी सैनिकांना अखेर शस्त्रे म्यान करण्यास भाग पाडले, असे बीएसएफचे महासंचालक (जम्मू सरहद्द) राम अवतार यांनी सांगितले.
पाककडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन होत असून, नागरी वस्त्यांवरही गोळीबार व उखळी तोफांचा मारा होत आहे. पाक रेंजर्सनी ३१ डिसेंबर रोजी केलेल्या गोळीबारात भारताचे पाच जवान शहीद झाले होते. त्यामुळे बीएसएफच्या जवानांनीही पाक सैनिकांचा खात्मा केला. तसे करताना बीएसएफचे जवान पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसल्याचे वृत्त असले तरी त्याला दुजोरा मिळू शकला नाही. (वृत्तसंस्था)
पाककडून नेहमीप्रमाणे इन्कार
पाकने मात्र आपले जवान मेल्याचा वा भारताकडून असे काही घडल्याचाच इन्कार केला आहे. सर्जिकल स्ट्राइकनंतरही असे काही घडल्याचे वृत्त पाकिस्तान सरकारने फेटाळून लावले होते. अर्थात नंतर पाक सैनिक मेल्याचे चित्रणच उपलब्ध झाले होते.
अर्निया विभागात घुसखोरीचा प्रयत्न उधळला
अर्निया विभागातील आंतरराष्टÑीय सीमेलगतच्या निकोवाल सीमा चौकीजवळ गुरुवारी सकाळी पावणेसहा वाजेच्या सुमारास बीएसएफच्या जवानांना काही लोक दिसून आले. आठवडाभरात पाकच्या गोळीबारात दोन भारतीय नागरिक ठार झाले होते.
ते घुसखोर असल्याचे लक्षात येताच भारतीय जवानांनी त्यांना आव्हान देत गोळीबार केला. यात एक घुसखोर ठार झाला, तर त्याचे साथीदार कसेबसे पसार झाले.
पाक सैनिकांनी बुधवारी केलेल्या गोळीबारात हेडकॉन्स्टेबल आर. पी. हाजरा गंभीर जखमी झाले होते. दुर्दैवाने त्याच दिवशी, त्यांच्या वाढदिवशीच ते हुतात्मा झाले.