BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 10:41 PM2024-09-20T22:41:45+5:302024-09-20T22:42:14+5:30
या वर्षी आतापर्यंत या सीमावर्ती भागात 6,29,880 हून अधिक 'याबा' ड्रग्स गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत.
आयझोल : मिझोराममधील भारत-बांगलादेश सीमेवर सीमा सुरक्षा दलाने सुमारे 40 कोटी रुपये किमतीच्या 'याबा' नावाच्या अमली पदार्थाच्या चार लाख गोळ्या जप्त केल्या आहेत. अधिकाऱ्यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. सीमा सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांनी गुरुवारी राज्य सरकारच्या विशेष अँटी नार्कोटिक्स पोलिसांसोबत संयुक्त कारवाई केली आणि राष्ट्रीय महामार्ग 6 वर आयझोल जिल्ह्यातील सेलिंग शहरात एक ट्रक अडवला.
ट्रक चालकाच्या केबिनच्या छतावरून चार लाख मेथॅम्फेटामाइन गोळ्या (याबा) असलेली एकूण 40 पाकिटे जप्त करण्यात आली. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत 40 कोटी रुपये आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, या वर्षी आतापर्यंत या सीमावर्ती भागात 6,29,880 हून अधिक याबा गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. मिझोराममध्येच 5.2 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले असून याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
मिझोराम पोलिसांनी सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांसह सैतुअल जिल्ह्यात दोन ऑपरेशनमध्ये 5.26 कोटी रुपयांच्या हेरॉइन आणि मेथॅम्फेटामाइन गोळ्या जप्त केल्या आहेत. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने शुक्रवारी ही माहिती दिली. पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, एक ऑपरेशन आयझोलमध्ये तर दुसरे ऑपरेशन गुरुवारी सेलिंगमध्ये करण्यात आले. पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) लालबियाकाथांग खियानगेट यांनी सांगितले की, प्रतिबंधित वस्तू बाळगल्याप्रकरणी दोन मणिपुरी आणि एक त्रिपुरा रहिवासी यांना अटक करण्यात आली आहे.
ते म्हणाले की, कारवाईदरम्यान गुरुवारी आयझोलमधील बावनकन येथे बोलेरो वाहन थांबविण्यात आले. वाहनाची झडती घेतली असता 11.34 लाख रुपये किमतीचे 378 ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आले. जप्तीप्रकरणी मणिपूरच्या चुराचंदपूर शहरातून दोघांना अटक करण्यात आली आहे. दुसऱ्या कारवाईत, सैतुअल जिल्ह्यातील सेलिंग गावाच्या हद्दीत एक ट्रक थांबवण्यात आला आणि 5.1 कोटी रुपये किमतीचे 39.6 किलो मेथॅम्फेटामाइन जप्त करण्यात आले. आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.