BSNLमधील हिस्स्याच्या विक्रीबाबत सरकारचं मोठं वक्तव्य, पाहा काय म्हटलंय?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 11:49 AM2022-03-24T11:49:25+5:302022-03-24T11:56:32+5:30
BSNL Disinvestment: सरकारी मालकीची दूरसंचार कंपनी (Government Telecom Company) भारत संचार निगम लिमिटेडच्या (BSNL) निर्गुंतवणुकीबाबत (Disinvestment) सरकारकडून मोठे विधान समोर आले आहे.
BSNL Disinvestment: सरकारी मालकीची दूरसंचार कंपनी (Government Telecom Company) भारत संचार निगम लिमिटेडच्या (BSNL) निर्गुंतवणुकीबाबत (Disinvestment) सरकारकडून मोठे विधान समोर आले आहे. सरकार सध्या बीएसएनएलच्या निर्गुंतवणुकीचा विचार करत नसल्याची माहिती समोर आली आहे. सरकारी मालकीच्या दूरसंचार कंपनी बीएसएनएलच्या निर्गुंतवणुकीची कोणतीही योजना नसल्याचं सरकारनं लोकसभेत स्पष्ट केलं.
लोकसभेतील डीएमकेचे खासदार डीएम कथीर आनंद यांनी बीएसएनएलच्या निर्गुंतवणुकीसाठी कंपनीची मालमत्ता विचारात घेतली जाईल का, असा प्रश्न विचारला होता. यावर राज्यमंत्री देवुसिंह चौहान यांनी उत्तर दिलं. "आतापर्यंत बीएसएनएलच्या निर्गुंतवणुकीची कोणतीही योजना नाही," असं त्यांनी स्पष्ट केलं. सरकारकडून भवन, जमीन, टॉवर आणि दूरसंचार उपकरणांसह बीएसएनएलच्या स्थावर मालमत्तेची माहिती मागणवण्यात आली आहे.
किती आहे संपत्ती?
मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, बीएसएनएलच्या सर्व सर्कलमध्ये ३२६६ इमारती, १३८८ टॉवर आणि सॅटेलाईट, २१०४२ दूरसंचार उपकरणे आणि ६८६ नॉन-टेलिकॉम उपकरणे आहेत. टेलिकॉम उपकरणांमध्ये प्लांट, केबल, कॉम्प्युटर सर्व्हर, इन्स्टॉलेशन चाचणी करणारी उपकरणे, लाईन्स आणि वायर्स यांचा समावेश होतो. तर नॉन टेलिकॉम उपकरणांमध्ये कम्प्युटर एन्ड वापरकर्ते उपकरणे, इलेक्ट्रिकल फिटिंग्ज, फर्निचर आणि फिक्स्चर, ऑटोमोटिव्ह आणि लॉन्च यांचा समावेश होतो.
२७ हजार कोटींचं कर्ज
आर्थिक वर्ष २०२१ मध्ये BSNL ची एकूण मालमत्ता ५१,६८६.८ कोटी रुपये इतकी झाली. मागील वर्षी ती ५९,१३९.८२ कोटी रुपये होती. कंपनीचे थकित कर्ज आर्थिक वर्ष २०१९-२० मधील २१,६४७.७४ कोटी रुपयांवरून २०२०-२१ मध्ये वाढून २७,०३३.६ कोटी रुपये झाले.