बीएसएनएल ग्राहकांची संख्या वाढली; ५ जी लवकरच येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2024 08:24 AM2024-08-04T08:24:27+5:302024-08-04T08:24:48+5:30
"आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत स्वदेशी तंत्रज्ञानासह ४जी नेटवर्क तयार आहे आणि काही महिन्यांत बीएसएनएलच्या माध्यमातून देशात त्याची सेवा उपलब्ध होईल."
ग्वाल्हेर : सरकारी कंपनी बीएसएनएलच्या ग्राहकांची संख्या वाढत आहे. कंपनीचे देशांतर्गत ४जी नेटवर्कही तयार असून, त्याचे ५जी मध्ये रूपांतर करण्याचे काम सुरू असल्याची माहिती केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी शनिवारी दिली.
ते म्हणाले की, ‘आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत स्वदेशी तंत्रज्ञानासह ४जी नेटवर्क तयार आहे आणि काही महिन्यांत बीएसएनएलच्या माध्यमातून देशात त्याची सेवा उपलब्ध होईल.
जिओ, एअरटेल आणि वोडाफोनने ४जी नेटवर्क तयार केले असताना बीएसएनएलने का नाही केले? असे लोकांनी विचारले होते. मात्र स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी आम्ही इतर देशांची उपकरणे वापरली नाहीत, हा पंतप्रधानांचा संकल्प होता, असे त्यांनी सांगितले.
४जीचे एक लाख टॉवर
ऑक्टोबरच्या अखेरीस ८०,००० टॉवर्स आणि उर्वरित २१,००० पुढील वर्षी मार्चपर्यंत बसवू. मार्च २०२५ पर्यंत ४जी नेटवर्कचे १ लाख टॉवर बसविले जातील. या ४जी प्रणालीवरून ५जी वापरता येईल. सेवा जलदगतीने देऊ, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.