फेब्रुवारी महिन्याचे रखडलेले बीएसएनएलचे वेतन आज होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2019 05:34 AM2019-03-16T05:34:12+5:302019-03-16T05:35:26+5:30
फेब्रुवारी महिन्याचे वेतन मिळण्यासाठी मार्चची १५ तारीख उजाडल्याने कर्मचारी, अधिकाऱ्यांत तीव्र नाराजीचे वातावरण आहे.
मुंबई : भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल)च्या देशभरातील १ लाख ६० हजार कर्मचाऱ्यांचे फेब्रुवारी महिन्याचे वेतन शुक्रवारी सरकारकडून बँकेत जमा झाले. मात्र दुपारी १ वाजता हे वेतन बँकेत जमा झाल्याने बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांच्या व अधिकाऱ्यांच्या खात्यात प्रत्यक्षात हे वेतन शनिवारी जमा होणार आहे. फेब्रुवारी महिन्याचे वेतन मिळण्यासाठी मार्चची १५ तारीख उजाडल्याने कर्मचारी, अधिकाऱ्यांत तीव्र नाराजीचे वातावरण आहे.
बीएसएनएलला या महिन्यात काही आर्थिक अडचणींमुळे वेतन वेळेवर देता आले नव्हते. मात्र, पुढील महिन्यापासून कर्मचाºयांचे वेतन वेळेवर जमा होईल, अशी ग्वाही बीएसएनएलचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनुपम श्रीवास्तव यांनी दिली. मार्च महिन्यात वेतन होण्यास विलंब झाल्याने कर्मचाºयांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले होते. ही परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी ठोस उपाययोजनेची मागणी बीएसएनएल संघटनेचे गणेश हिंगे यांनी केली आहे.
महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (एमटीएनएल)च्या कर्मचारी व अधिकाºयांचे वेतन नोव्हेंबरपासून दर महिन्यात विलंबाने होत आहे. फेब्रुवारीचे वेतन १४ मार्चला झाले. एमटीएनएलच्या कर्मचाºयांमध्ये याबाबत नाराजी आहे. मात्र यावर अद्याप ठोस मार्ग काढण्यात आलेला नाही. युनायटेड फोरमतर्फे यासाठी गुरुवारी प्रभादेवी येथील एमटीएनएल कार्यालयाच्या प्रांगणात निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता. प्रशासनाने वेतनाची समस्या त्वरित कायमस्वरूपी मार्गी लावावी, अशी मागणी युनायटेड फोरमचे एस.एम. सावंत यांनी केली आहे.