अजबच! उमेदवार फरार, नेते आणि कार्यकर्ते करताहेत प्रचार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 03:30 PM2019-05-14T15:30:04+5:302019-05-14T15:31:06+5:30
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. सर्वाधिक खासदार निवडून देणाऱ्या उत्तर प्रदेशमध्येही प्रचाराचा ज्वर टीपेला पोहोचला आहे.
लखनौ - लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. सर्वाधिक खासदार निवडून देणाऱ्या उत्तर प्रदेशमध्येही प्रचाराचा ज्वर टीपेला पोहोचला आहे. दरम्यान येथील एका मतदारसंघात असाही एक उमेदवार आहे जो फरार आहे. मात्र त्याच्या प्रचारासाठी दिग्गज नेते पोहोचत आहेत. तसेच कार्यकर्तेही जोरदार प्रचार करत आहेत. या उमेदवाराचे नाव आहे अतुल राय. सपा-बसपा महाआघाडीचे उमेदवार अतुल राय यांच्याविरोधात बलात्कार प्रकरणामध्ये अजामिनपात्र वॉरंट निघालेले आहे. त्यामुळे ते फरारी झाले आहेत.
अतुल राय हे उत्तर प्रदेशमधील मऊ जिल्ह्यातील घोसी लोकसभा मतदारसंघातून महाआघाडीचे उमेदवार आहेत. मात्र त्यांच्याविरोधात एका तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून वाराणसीमधील लंका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर न्यायालयाने त्यांच्याविरोधात अजामिनपात्र वॉरंट जारी केले आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी करताना अतुल राय यांना 23 मे पर्यंत अटकेपासून संरक्षण दिले असून, प्रकरणाची पुढील सुनावणी 17 मे रोजी होणार आहे.
Supreme Court Vacation Bench to hear on 17th May, the petition filed by Ghosi Atul Rai, SP-BSP candidate from Uttar Pradesh, seeking protection from arrest in a rape case till 23rd May. pic.twitter.com/DPofMRmrTr
— ANI (@ANI) May 14, 2019
पत्नीची भेट घालून देण्याचा बहाणा करून अतुल रार यांनी लंका येथील फ्लॅटवर नेऊन आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप एक तरुणीने केला होता. त्यानंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे बनवलेला व्हिडीओ प्रसारित करण्याची धमकी देऊन अतुल राय यांनी वारंवार शोषण केल्याचा आरोप पीडित तरुणीने केला होता. दरम्यान, सध्या पोलीस अतुल राय यांचा शोध घेत आहेत.
दरम्यान, अतुल राय यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहे. सदर तरुणी आपल्या ऑफीसमध्ये येत असे. तसेच निवडणूक लढण्याचा बहाणा करून पैसे उकळत असे. निवडणुकीत उमेदवरा बनल्यानंतर तिने मला ब्लॅकमेल करण्याचाही प्रयत्न केला. त्यासंदर्भातील गुन्हा बलियामधील नरही ठाण्यात नोदवलेला आहे, असे अतुल राय यांनी म्हटले आहे. मात्र बसपा आणि अतुल राय यांना सत्तेचा दुरुपयोग करून बदनाम करण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जात असल्याचा आरोप बसपाप्रमुख मायावती यांनी केला आहे. दुसरीकडे अतुल राय हे फरार असल्याने भाजपाकडून त्यांच्याविरोधात आक्रमक प्रचार सुरू आहे. तर फरार उमेदवाराला मतदान कसे करायचे असा प्रश्न मतदारांना पडला आहे. तरीही अतुल राय यांच्या अनुपस्थितीचा मतदानावर परिणाम होणार नसल्याचा दावा सपा-बसपा महाआघाडीकडून करण्यात येत आहे.