रामलला प्राणप्रतिष्ठा; मायावती यांना मिळाले निमंत्रण; अयोध्येला जाणार का? म्हणाल्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2024 12:12 PM2024-01-13T12:12:36+5:302024-01-13T12:15:06+5:30
Ayodhya Ram Mandir: राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमंत्रणावरून मानापमान नाट्य सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
Ayodhya Ram Mandir: २२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात रामलला प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या भव्य सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सुमारे ७ ते ८ हजार मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. एकीकडे विरोधक भाजपा, संघावर टीका करताना दुसरीकडे निमंत्रणांवरून मानापमान नाट्य घडताना दिसत आहे. बसपा प्रमुख मायावती यांना राम मंदिर सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आल्याबाबत माहिती देण्यात आली आहे.
विश्व हिंदू परिषदेने याबाबत सांगितले की, बसपा प्रमुख मायावती यांनी निमंत्रण स्वीकारले असले तरी त्या या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत. यापूर्वी अखिलेश यादव यांनी आपल्याला निमंत्रण दिलेले नसून त्याची गरज नसल्याचे वक्तव्य केले होते. मात्र दोन्ही माजी मुख्यमंत्र्यांना निमंत्रण पाठवण्यात आल्याचे विहिंपने म्हटले आहे.
अखिलेश यादव यांना पुन्हा निमंत्रण पाठवू
विहिंपचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष आलोक कुमार म्हणाले की, अखिलेश यादव यांना कुरिअरने आमंत्रण पाठवण्यात आले होते. यावर कोणताही वाद नाही. जर त्यांना त्यांच्या दाव्यानुसार निमंत्रण मिळाले नसेल, तर आम्ही त्यांना पुन्हा निमंत्रण पाठवू शकतो. बसपा प्रमुख मायावती यांनाही आमचे निमंत्रण मिळाले आहे. राजकीय पक्षांच्या अध्यक्षांना आमंत्रित करण्यात आले आहे, असेही ते म्हणाले.
दरम्यान, अखिलेश यादव यांनी आधी सांगितले होते की, त्यांना निमंत्रण दिल्यास अयोध्येला जाईन. मात्र यानंतर बोलताना, प्रभू श्रीराम जेव्हा बोलावतील तेव्हाच जाईन, असे अखिलेश यादव यांनी म्हटले आहे.