ज्ञानवापी वादावर मायावतींचे मोठे विधान; म्हणाल्या, "धार्मिक भावना भडकावण्याचे षडयंत्र, सर्व धर्माच्या लोकांनी सतर्क राहावे"
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 11:44 AM2022-05-18T11:44:43+5:302022-05-18T11:57:10+5:30
Gyanvapi Masjid Case : लोकांच्या धार्मिक भावना भडकावण्याचे हे सुनियोजित कारस्थान असल्याचे मायावती म्हणाल्या. यासोबतच त्यांनी जनतेला बंधुभाव जपण्याचे आवाहनही केले आहे.
नवी दिल्ली : ज्ञानवापी मशिदीच्या (Gyanvapi Masjid) मुद्द्यावरून सध्या देशातील राजकारण चांगलेच तापले आहे. यावरून आता बसपाच्या प्रमुख मायावती यांनी भाष्य केले आहे. मायावती यांनी हे एक षडयंत्र असल्याचे म्हटले आहे. लोकांच्या धार्मिक भावना भडकावण्याचे हे सुनियोजित कारस्थान असल्याचे मायावती म्हणाल्या. यासोबतच त्यांनी जनतेला बंधुभाव जपण्याचे आवाहनही केले आहे.
ज्ञानवापीबाबत सुरू असलेल्या वादावर मायावती म्हणाल्या की, ज्याप्रकारे षडयंत्रा अंतर्गत लोकांच्या धार्मिक भावना भडकवल्या जात आहेत, तर भाजपला आपला देश कोणत्या गोष्टींवर मजबूत होईल, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. यासोबतच, विशेषत: धार्मिक समुदायाशी संबंधित असलेल्या ठिकाणांची नावेही एकामागून एक बदलली जात आहेत. यामुळे आपल्या देशात केवळ शांतता, सौहार्द आणि बंधुभावच नाही तर परस्पर द्वेषाची भावना निर्माण होईल. हे सर्व खूपच चिंताजनक आहे, असेही मायावती यांनी म्हटले आहे.
याचबरोबर, जनतेला आवाहन करत मायावती म्हणाल्या की, यापासून देशातील सर्वसामान्य जनता आणि सर्व धर्माच्या लोकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. यातून ना देशाचा फायदा होणार आहे, ना सर्वसामान्यांना फायदा होणार आहे. याशिवाय, बसपाकडून या प्रकरणी जनतेला आवाहन आहे की, त्यांनी परस्पर बंधुभाव जपावा, असेही मायावती यांनी सांगितले.
काय म्हणाले सर्वोच्च न्यायालय?
वाराणसीच्या ज्ञानवापी मशीद प्रकरणावरील वादावर मंगळवारी महत्त्वपूर्ण निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने (SC) राज्य सरकारला मशिदीच्या आवारातील ज्या ठिकाणी हिंदू धर्मानुसार शिवलिंग सापडले आहे, त्या भागाचे संरक्षण करण्याचे निर्देश दिले. कोणत्याही मुस्लिमाला तेथे नमाज अदा करण्यापासून रोखले जाणार नाही किंवा अडवणूक केली जाणार नाही, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.पुढील सुनावणी गुरुवारी, १९ मे रोजी होईल.