"ताडी गंगेच्या पाण्याहून शुद्ध अन् पवित्र; ती प्यायलानं कोरोनापासून रक्षण होईल"
By मुकेश चव्हाण | Published: December 23, 2020 01:02 PM2020-12-23T13:02:55+5:302020-12-23T13:03:40+5:30
उत्तर प्रदेशातील बहुजन समाज पक्षाचे अध्यक्ष भीम राजभर यांनी एक गजब उपाय सांगितल्यानं त्यांची देशभर चर्चा रंगू लागली आहे.
नवी दिल्ली: ब्रिटनसह काही देशांमध्ये कोरोनाच्या विषाणूचे नवे स्वरूप आढळल्यानंतर जगभरात पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र भारतात नव्या प्रकारच्या कोरोनाचा संसर्ग झालेला एकही रुग्ण अद्याप आढळलेला नाही. परंतु, आता आढळून येणाऱ्या रुग्णांच्या चाचण्या अधिक काळजीपूर्वक कराव्या लागतील, असे ‘एम्स’चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितले. मात्र कोरोनाच्या संकटादरम्यान उत्तर प्रदेशातील बहुजन समाज पक्षाचे अध्यक्ष भीम राजभर यांनी एक गजब उपाय सांगितल्यानं त्यांची देशभर चर्चा रंगू लागली आहे.
नागरिकांनी देशी दारु 'ताडी' जास्त प्रमाणात घेतली तर ते कोरोनापासून स्वत:चं संरक्षण करू शकतात, असा दावा केला आहे. तसेच 'ताडी'चा एक एक थेंब गंगेच्या पाण्याहून शुद्ध आणि पवित्र असल्याचंही भीम राजभर यांनी म्हटलं आहे. 'ताडी'मुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते वाढत असल्याचा गजब दावाही भीम राजभर यांनी केला आहे. उत्तर प्रदेशातील बलियामध्ये आयोजित करण्यात आलेल्या बहुजन समाज पक्षाच्या एका जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते.
'ताडी' कोरोनापासून वाचण्यासाठी कशी मदत करू शकते, याचं मात्र कोणतंही प्रमाणपत्र किंवा वैद्यकीय पुरावा भीम राजभर यांना देता आलेला नाही. त्यामुळे भीम राजभर यांच्या या वादग्रस्त विधानानंतर त्यांच्यावर देशभरातून टीका करण्यात येत आहे.
दरम्यान, गेले अनेक दिवस संपूर्ण देश कोरोनाच्या सावटाखाली आहे. मात्र आता हळूहळू कोरोनाचे रुग्ण कमी होत असल्याचं आशादायक चित्र दिसू लागलं आहे. कारण गेल्या २४ तासात देशात फक्त १९ हजार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे ही फारच दिलासादायक बाब आहे. कारण मागील काही दिवस रुग्ण संख्या ही बरीच होती. पण आता त्यात घट झाल्याचं दिसून येत आहे. देशात आतापर्यंत १ कोटी ७५ हजार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या २४ तासात देशात १९,५५६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर देशात ३०१ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशभरात २ लाख ९२ हजार अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
लसनिर्मितीवर परिणाम नाही
ब्रिटनमध्ये आढळलेला नवा विषाणू अद्याप भारतात आढळलेला नाही. नव्या विषाणूचा सध्या विकसित करण्यात येत असलेल्या लसींवर परिणाम हाोणार नाही. संसर्ग वाढतोय, परंतु त्याने गंभीर आजार होत नाही. - डॉ. व्ही. के. पॉल, सदस्य, निती आयोग
नवा स्ट्रेन प्राणघातक नाही
कोरोना विषाणूचा नवा प्रकार प्राणघातक नाही. विषाणूचा नवा प्रकार जास्त संसर्गजन्य असून त्यावर काेराेनावरील लस परिणामकारक ठरणार नाहीत, असे कुठलेही पुरावे सध्या तरी नाहीत. मात्र, नागरिकांनी जास्त काळजी घ्यावी. - डॉ. विवेक मूर्ती, महाशल्यचिकित्सक
घाबरण्याचे कारण नाही
नव्या प्रकारचा विषाणू खूप वेगाने पसरतो. मात्र, असे नाही की, तो खूप जास्त धोकादायक आहे आणि लोकांचा मृत्यू होईल. नव्या विषाणूमुळे अँटिबॉडींमध्ये, इतर रचनेमध्ये थोडा फरक राहू शकतो. त्याच्याविरुद्ध लस निष्प्रभ ठरेल असे नाही. - डॉ. शेखर मांडे, महासंचालक, सीएसआयआर