बसपच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 04:27 AM2019-05-29T04:27:06+5:302019-05-29T04:27:14+5:30
उत्तर प्रदेशमधील बिजनोर येथे बहुजन समाज पक्षा (बसप)चे नेते हाजी एहसान (५५) व त्यांचा भाचा शोएब (२८) यांची तीन हल्लेखोरांनी मंगळवारी गोळ्या झाडून हत्या केली.
बिजनोर : उत्तर प्रदेशमधील बिजनोर येथे बहुजन समाज पक्षा (बसप)चे नेते हाजी एहसान (५५) व त्यांचा भाचा शोएब (२८) यांची तीन हल्लेखोरांनी मंगळवारी गोळ्या झाडून हत्या केली. लोकसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर उत्तर प्रदेशात राजकीय कार्यकर्त्यांची हत्या होण्याची ही तिसरी घटना आहे.
एहसान व शोएब आपल्या कार्यालयात बसलेले असताना दुपारी अडीच वाजता ही घटना घडली. तीन हल्लेखोरांपैकी एक जण एहसान यांच्या कार्यालयाबाहेर उभा राहिला. बाकीच्या दोघांनी कार्यालयात जाऊन एहसान यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यांना रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या शोएबवरही गोळीबार करण्यात आला. या हल्लेखोरांनी मिठाईच्या बॉक्समध्ये पिस्तूल लपविले होते.
एहसान, शोएब यांची हत्या पूर्ववैमनस्यातून झाली की राजकीय वैरातून याचा तपास पोलीस करीत आहेत. (वृत्तसंस्था)