बसपा खासदाराला पत्नी व मुलासह अटक
By admin | Published: April 7, 2016 07:49 PM2016-04-07T19:49:36+5:302016-04-07T19:49:36+5:30
बहुजन समाज पार्टीचे (बसपा) खासदार नरेंद्र कश्यप यांना त्यांची पत्नी व मुलासह सुनेच्या मृत्यूप्रकरणी हुंडाविरोधी कायद्याअंतर्गत गुरुवारी अटक करण्यात आली.
हुंडाबळीप्रकरणी: सुनेचा मृतदेह आढळला
गाझियाबाद: बहुजन समाज पार्टीचे (बसपा) खासदार नरेंद्र कश्यप यांना त्यांची पत्नी व मुलासह सुनेच्या मृत्यूप्रकरणी हुंडाविरोधी कायद्याअंतर्गत गुरुवारी अटक करण्यात आली.
राज्यसभा सदस्य असलेले कश्यप आणि त्यांच्या पत्नी देवेंद्री गेल्या दोन दिवसांपासून छातीत दुखत असल्याच्या कारणावरून स्थानिक हॉस्पिटलमध्ये भरती होते. कविनगर पोलिसांनी कश्यप दाम्पत्यास तेथून अटक केली.
पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार त्यांचा मुलगा सागरलाही अटक करण्यात आली आहे. सागर मृत हिमांशीचा पती आहे. २९ वर्षीय हिमांशी बुधवारी संजयनगरमधील त्यांच्या निवासस्थानाच्या बाथरुममध्ये मृतावस्थेत आढळली होती. तिच्या डोक्याला गोळी लागली होती. प्राथमिक चौकशीत हे हुंडाबळीचे प्रकरण असल्याचे निदर्शनास आल्यानंतर तिघांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी काल कश्यप, देवेंद्री, सागर, कश्यप यांच्या दोन मुली शोभा व सरिता आणि सागरचा लहान भाऊ सिद्धार्थ यांच्याविरुद्ध भांदविच्या ४९८ ए (पती अथवा त्याच्या कुटुंबीयांकडून छळ), ३०४ बी (जळाल्याने अथवा इजा झाल्याने महिलेचा मृत्यू) आणि हुंडाविरोधी कायद्याच्या कलम तीन व चार अन्वये गुन्हा नोंदविला होता.
बसपाचे माजी मंत्री हिरालाल कश्यप यांची मुलगी हिमांशी हिचा तीन वर्षांपूर्वी सागरसोबत विवाह झाला होता. या दाम्पत्याला एक वर्षाचा मुलगाही आहे. नरेंद्र कश्यप यांचे कुटुंब हुंड्यासाठी आमच्या मुलीचा अतोनात छळ करीत होते,असा आरोप मृत हिमांशीचे काका हरिओम कश्यप यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत केला आहे. (वृत्तसंस्था)