रमेश बिधूडींचे आक्षेपार्ह विधान, दानिश अलींचे PM मोदींना पत्र; म्हणाले, “जग पाहतंय की...”
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2023 05:30 PM2023-09-29T17:30:41+5:302023-09-29T17:33:58+5:30
Danish Ali Letter To PM Modi: भाजप खासदार रमेश बिधूडींनी केलेल्या वादग्रस्त विधानाप्रकरणी दानिश अलींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना ३ पानी पत्र लिहून महत्त्वाची मागणी केली आहे.
Danish Ali Letter To PM Modi: लोकसभेमध्ये भाजप खासदार रमेश बिधूडी यांनी केलेल्या एका वादग्रस्त विधानामुळे वाद निर्माण झाला आहे. भाजप खासदार रमेश बिधूडी संसदेच्या विशेष अधिवेशनातील चौथ्या दिवशी लोकसभेमध्ये चंद्रयान-३ च्या यशावर बोलत होते. खासदार दानिश अली यांनी काही टिप्पणी केली होती. त्यावर रमेश बिधूडी संतप्त झाले. तसेच त्यांनी लोकसभेमध्ये दानिश अली यांच्याविरोधात वादग्रस्त शब्दांचा वापर केला. यावरून मोठा वाद निर्माण झाला. काँग्रेसपासून तृणमूल काँग्रेसपर्यंत सर्व पक्षांनी भाजपावर टीका केली आहे. यातच आता दानिश अली यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तीन पानी पत्र लिहून आपली कैफियत मांडली आहे.
रमेश बिधूडी यांच्याशी लोकसभा अध्यक्षांनी चर्चा केली. रमेश बिधूडी यांच्या विधानाबाबत नाराजी व्यक्त केली असून, कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. तसेच भाषेच्या मर्यादेवर लक्ष देण्याचा सल्ला दिला आहे. वाद वाढल्यानंतर रमेश बिधूडी यांच्या वक्तव्यातील वादग्रस्त भाग सभागृहाच्या कामकाजातून हटवण्यात आला आहे. दुसरीकडे, भाजपने खासदार रमेश बिधूडी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर आता दानिश अली यांनी थेट पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले आहे.
दानिश अली यांनी आपल्या पत्रात नेमके काय म्हटलेय?
दानिश अलीने पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे. तसेच संसदेची प्रतिष्ठा राखण्याचे आवाहनही पंतप्रधानांना केले. अशा वर्तनाचा जाहीर निषेध केल्याने संसदीय कामकाजाचा उच्च दर्जा राखण्यासाठी तुमची बांधिलकी दिसून येईल, असे म्हटले आहे. तसेच या प्रकरणावर पंतप्रधान मोदी यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी दानिश अली यांनी दिली आहे. जीवाला धोका असल्याने सुरक्षा प्रदान करावी. याशिवाय रमेश बिधूडी यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही दानिश अली यांनी केली आहे.
संसदीय लोकशाहीचे मार्गदर्शक म्हणून संपूर्ण जग आपल्याकडे पाहत आहे
संसदीय लोकशाहीचे मार्गदर्शक म्हणून संपूर्ण जग आपल्याकडे पाहत आहे. सर्व खासदारांना सभागृहाचा शिष्टाचार आणि आचरण यांचे महत्त्व राखण्याची बाब लक्षात आणून देऊ इच्छितो. अशा अशोभनीय घटनांना आपल्या लोकशाहीत स्थान नसावे. मी विनंती करतो की रमेश बिधूडी यांच्या निंदनीय वर्तनाची जबाबदारी लवकरात लवकर निश्चित करण्यात यावी. योग्य ती शिक्षा द्यावी जेणेकरुन भविष्यात सभागृहात असे प्रकार कोणी करू नये, अशी मागणी दानिश अली यांनी आपल्या पत्रात केली आहे.
दरम्यान, दानिश अली यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून रमेश बिधूडी यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केल्याचे सांगितले जात आहे. बिधूडी यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसनेही केली आहे.