बसपा प्रमुख मायावती यांच्या वडिलांचे निधन, 95व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2020 19:59 IST2020-11-19T19:58:03+5:302020-11-19T19:59:31+5:30
मायावती या मूळ गौतमबुद्ध नगर जिल्ह्यातील बादलपूर येथील रहिवासी आहेत. त्यांचे वडील प्रभू दयाल हे सरकारी नोकरीत होते.

बसपा प्रमुख मायावती यांच्या वडिलांचे निधन, 95व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
लखनौ/ नवी दिल्ली - बसपा प्रमुख मायावती (BSP Supremo Mayawati) यांचे वडील प्रभू दयाल (Prabhu Dayal) यांचे निधन झाले आहे. ते 95 वर्षांचे होते. प्रभू दयाल यांच्या निधनानंतर बसपाचे राष्ट्रीय महासचिव आणि राज्यसभा खासदार सतीश चंद्र मिश्रा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक नेत्यांनी दुःख व्यक्त केले आहे. दयाल हे दिल्लीतील रकाबगंज येथे राहत होते. उद्या दिल्ली येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील.
मायावतींना आयएएस बनवण्याची होती इच्छा -
मायावती या मूळ गौतमबुद्ध नगर जिल्ह्यातील बादलपूर येथील रहिवासी आहेत. त्यांचे वडील प्रभू दयाल हे सरकारी नोकरीत होते. त्यामुळे ते मुलांच्या शिक्षणासाठी दिल्ली येथे शिफ्ट झाले होते. यानंतर मायावती आणि त्यांच्या सर्व भावंडांचे शिक्षण दिल्ली येथेच झाले. मायावती यांना आयएएस अधिकारी बनवण्याची प्रभू दयाल यांची इच्छा होती. मात्र, बसपा संस्थापक कांशीराम यांच्या संपर्कात आल्यानंतर मायावती यांनी राजकारणाचा मार्ग स्वीकारला. यानंतर त्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीही झाल्या होत्या.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दुःख व्यक्त करत, ''उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावतीजी यांचे वडील श्री प्रभू दयालजी यांचे निधन अत्यंत दुःखद आहे. मी मायावती तथा त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे. प्रभू श्री रामांना प्रार्थना आहे, की दिवंगत आत्म्याला आपल्या श्री चरणांत स्थान द्यावे. ॐ शांती!'', असे ट्विट केले आहे.
उत्तर प्रदेश की पूर्व मुख्यमंत्री सुश्री मायावती जी के पिता श्री प्रभु दयाल जी का निधन अत्यंत दुःखद है।
— Yogi Adityanath (@myogiadityanath) November 19, 2020
मेरी संवेदनाएं सुश्री मायावती जी तथा शोक संतप्त परिजनों के साथ हैं।
प्रभु श्री राम से प्रार्थना है कि दिवंगत आत्मा को अपने श्री चरणों में स्थान प्रदान करें।
ॐ शांति!
मिशन 2022च्या तयारीत बसपा -
बसपा प्रमुख मायावती यांनी नुकताच पक्षात मोठा बदल केला आहे. मऊचे भीम राजभर (Bheem Rajbhar) यांच्याकडे त्यांनी उत्तर प्रदेश बहुजन समाज पक्षाच्या प्रदेश अध्यक्ष पदाची धुरा दिली आहे. मायावती यांच्या या निर्णयाकडे 2022 मध्ये राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुशंगाने बघितले जात आहे.