बुद्धांची शिकवणच संकटात मार्ग दाखवेल- मोदी
By admin | Published: May 4, 2015 11:12 PM2015-05-04T23:12:10+5:302015-05-05T03:23:11+5:30
गौतम बुद्धांची शिकवणच संकटातून सावरण्याचा मार्ग दाखवेल. भूकंपाने उद्ध्वस्त झालेल्या नेपाळचे दु:ख वेदनादायी असून आमचा प्रिय बंधू असलेला हा
नवी दिल्ली : गौतम बुद्धांची शिकवणच संकटातून सावरण्याचा मार्ग दाखवेल. भूकंपाने उद्ध्वस्त झालेल्या नेपाळचे दु:ख वेदनादायी असून आमचा प्रिय बंधू असलेला हा देश पुन्हा सावरेल, अशी आशा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली.
भूकंपाच्या संकटातून सावरण्याची प्रक्रिया दीर्घकाळ चालणारी आहे. नेपाळवासीयांचे दु:ख समजून घेत आपण त्यांचे अश्रू पुसू या, असे ते येथे बुद्ध पौर्णिमेनिमित्त इंटरनॅशनल बुद्धिस्ट कॉन्फेडरेशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमात म्हणाले.
नेपाळ आणि भारतात शक्तिशाली भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांना एक मिनिटांचे मौन पाळून आदरांजली अर्पण करण्यात आली. नेपाळ ही बुद्धांची जन्मभूमी आहे. सध्या हा देश भूकंपामुळे संकटात सापडला आहे. नेपाळवासीयांना यातून सावरण्यासाठी शक्ती लाभावी यासाठी बुद्धांची प्रार्थना करू या, असे ते म्हणाले. बुद्धांनी दलित, दुर्बल आणि उपेक्षित घटकांसाठी महिलांच्या सबलीकरणाचा संदेश दिला होता. ‘एकला चलो’ वर त्यांचा विश्वास नव्हता. सर्वांना सोबत घेऊन चालण्याची प्रेरणा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्धांच्या शिकवणीतूनच घेतली.