रोहित वेमुलाच्या कुटुंबीयांनी स्वीकारला बौद्ध धर्म
By admin | Published: April 14, 2016 12:02 PM2016-04-14T12:02:38+5:302016-04-14T15:17:32+5:30
हैदराबाद विद्यापीठात शिकणा-या रोहित वेमुला या विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर त्याची आई व भावाने आज बौद्ध धर्माचा स्वीकार केला.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १४ - हैदराबाद विद्यापीठात शिकणा-या रोहित वेमुला या विद्यार्थ्याने जानेवारी महिन्यात केलेल्या आत्महत्येवरून उठलेले वादळ आत्ता कुठे शांत होत असतानाच रोहितची आई व त्याचा भाऊ राजा, यांनी आज हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्म स्वीकारला. भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज 125व्या जयंती असून त्या पार्श्वभूमीवरच रोहितच्या कुटुंबियांनी आज दादरमधील आंबेडकर भवनात धर्मांतर केले, अशी माहिती रिपब्लिकन पक्षाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिली.
हैदराबादच्या केंद्रीय विद्यापीठात पीएच.डी करणा-या रोहितने १७ जानेवारी रोजी आत्महत्या केली होती. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या नेत्यावर हल्ला केल्या प्रकरणी रोहित आणि अन्य चार विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आले होते. विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेच्या उपसमितीच्या शिफारसीवरुन ही कारवाई करण्यात आली होती. या पाचविद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासाच्या वर्गाला उपस्थित रहाण्याव्यतिरिक्त वसतिगृहात येण्यावर बंदी घालण्यात आली होती.
रोहितच्या आत्महत्येमुळे देशभरात मोठा गदारोळ माजला होता. या मुद्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरत रोहितच्या आत्महत्येला भाजपा, अभाविप आणि विद्यापीठ प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोपही झाला. यावरून संसदेतही गोंधळ झाला, वादळी चर्चाही झाली होती.
रोहितच्या आत्महत्येप्रकरणी दोषींना शिक्षा देण्याची मागणी करत त्याच्या आईने आंदोलनही केले होते. अखेर आता त्यांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला.
दलित असल्याने रोहितचे मानसिक आणि आर्थिक खच्चीकरण करण्यात आले असल्याचा आरोप करण्यात आला होता. अखेरीस आता रोहितची आई राधिका वेमुला आणि भाऊ राजा वेमुला यांनी हिंदू धर्मावर पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 'मार्च महिन्यात माझी व त्यांची या विषयावर चर्चा झाली होती. डॉ. बाबासाहेब आंबेकरांच्या जयंतीदिनी आपल्याला अधिकृतरित्या बौद्ध धर्माचा स्वीकार करण्यास आवडेल, असे त्यांनी सांगितल्याचे रोहितच्या मित्राने माझ्यापाशी नमूद केले होते' असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.