Budget 2018 : प्राप्तिकरात घट, ज्येष्ठांना चार हजार कोटींची सवलत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 05:53 AM2018-02-02T05:53:52+5:302018-02-02T05:56:27+5:30
देशातील कोट्यवधी ज्येष्ठ नागरिकांना अधिक प्रतिष्ठेने जगता यावे यासाठी अरुण जेटली यांनी अर्थसंकल्पात अनेक सवलती जाहीर केल्या.
नवी दिल्ली - देशातील कोट्यवधी ज्येष्ठ नागरिकांना अधिक प्रतिष्ठेने जगता यावे यासाठी अरुण जेटली यांनी अर्थसंकल्पात अनेक सवलती जाहीर केल्या. प्राप्तिकर कमी भरावा लागेल व हाती असलेल्या पुंजीवर दीर्घकाळ निश्चित दराने व्याज मिळून ज्येष्ठांच्या हाती चार पैसे अधिक राहतील, असे त्यांचे स्वरूप आहे.
नव्या सवलती अशा
सध्या ज्येष्ठ नागरिकांनाही इतरांप्रमाणेच, प्राप्तिकर कायद्याच्या कलम १९४ ए नुसार, बँका व पोस्टात ठेवलेल्या ठेवींवरील वर्षाचा १० हजार रुपयांपर्यंतचे व्याजाचे उत्पन्न करमुक्त होते. त्याहून अधिकच्या व्याजातून प्राप्तिकर कापून घेतला जातो. आता करमुक्त व्याजाची मर्यादा ज्येष्ठ नागरिकांसाठी वर्षाला ५० हजार रुपये होईल. ही सवलत मुदत ठेवी व आवर्ती ठेवींवरील व्याजाला मिळेल.
सध्या प्राप्तिकर कायद्याच्या कलम ८० डी नुसार ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य विम्याचा हप्ता किंवा वैद्यकीय उपचारांसाठी खर्च केलेली वर्षाला ३० हजार रुपयांपर्यंतची रक्कम करपात्र उत्पन्नातून वजावट मिळते. ती वर्षाला ५० हजार रुपये होईल.
काही ठराविक गंभीर आजारांवरील उपचारांसाठी केलेला वर्षाला ६० हजार रुपयांपर्यंतचा खर्च करपात्र उत्पन्नातून वजावट मिळते. आता ही खर्च मर्यादा ज्येष्ठांसाठी वर्षाला ८० हजार रुपये व अतिज्येष्ठांसाठी (८० वर्षांहून अधिक) वर्षाला एक लाख रुपये होईल.
वय वंदन योजना वाढविली
सध्या आयुर्विमा महामंडळातर्फे ज्येष्ठांसाठी ‘प्रधानमंत्री वय वंदन योजना’ राबविली जाते.
या योजनेखाली ज्येष्ठ नागरिकांच्या एकरकमी ठेवीवर १० टक्के दराने १० वर्षे हमखास परतावा देण्याची हमी आहे. या योजनेची मुदत दोन वर्षे (मार्च २०२० पर्यंत) वाढविली आहे.
या योजनेत एका व्यक्तीला जास्तीत जास्त ७.५ लाख रुपये ठेवता येतात. ही ठेवमर्यादा १५ लाख रुपये करण्यात आली आहे. या योजनेत ७.५ लाख रुपये ठेवल्यास दरमहा पाच हजार रुपये व १५ लाख रुपये ठेवल्यास दरमहा १० हजार रुपये परतावा मिळेल.