Budget 2018 : स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प कोणी मांडला?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2018 07:45 AM2018-01-29T07:45:15+5:302018-01-29T07:59:54+5:30
स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री म्हणून आर. के. षण्मुखम चेट्टी यांची नियुक्ती करण्यात आली होती.
मुंबई - स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री म्हणून आर. के. षण्मुखम चेट्टी यांची नियुक्ती करण्यात आली होती. मद्रासमध्ये पेशाने वकील आणि उद्योजक असणाऱ्या चेट्टी यांनी स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात विविध पदे भूषविली. 1920 ते 1922 या काळामध्ये चेट्टी मद्रास लेजिस्लेटिव्ह कौन्सीलमध्ये कार्यरत होते, त्यानंतर त्यांनी स्वराज पक्षामध्ये प्रवेश केला आणि 1924 साली केंद्रीय लेजिस्लेटिव्ह असेम्ब्लीचे सदस्य म्हणून निवडून गेले. ओटावा येथे 1932 साली झालेल्या इम्पेरियल अर्थपरिषदेमध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते. 1932 मध्ये ते केंद्रीय लेजिस्लेटिव्ह असेम्ब्लीचे उपसभापती आणि नंतर सभापती झाले. त्यानंतर 1935मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.
1935 ते 1941 अशा सहा वर्षांच्या काळामध्ये ते कोचीन संस्थाचे दिवाण होते. कोचीन बंदराचा विकास करण्यासाठी त्यांनी विविध योजना राबवल्या होत्या. 1938 साली जीनिव्हामध्ये लिग ऑफ नेशन्ससाठी भारताचे प्रतिनिधी म्हणूनही चेट्टी गेले होते. त्यानंतर ते अल्पकाळासाठी भोपाळच्या नवाबाचे घटनात्मक विषयांचे सल्लागार झाले.
स्वतंत्र भारताचे ते पहिले अर्थमंत्री म्हणून नेमले गेले. 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प मांडण्याची संधी त्यांना मिळाली. या अर्थसंकल्पात 171.15 कोटी रुपये महसूलाची नोंद आणि 25.59 कोटी रुपयांची वित्तीय तूट नोंदवली होती. अर्थमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द केवळ साडेसात महिन्यांची होती. त्यानंतर त्यांच्या जागी जॉन मथाई यांची नियुक्ती करण्यात आली. 5 मे 1953 रोजी षण्मुखम चेट्टी यांचे हृदयविकाराने निधन झाले.