Budget 2019: पायाभूत विकासाला अर्थसंकल्पात ‘बूस्ट’
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2019 05:37 AM2019-02-02T05:37:43+5:302019-02-02T05:38:46+5:30
अंतरिम अर्थसंकल्पात सरकारने पायाभूत सुविधांच्या विकासावर भर दिला आहे.
नवी दिल्ली : अंतरिम अर्थसंकल्पात सरकारने पायाभूत सुविधांच्या विकासावर भर दिला आहे. पायाभूत सुविधा या अर्थव्यवस्थेच्या विकासाचा कणा आहेत, असेच भाष्य वित्तमंत्र्यांनी केले. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेसाठी अर्थसंकल्पात १९ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मागील वर्षीपेक्षा हा आकडा साडेतीन हजार कोटींनी वाढला आहे.
पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत ग्रामीण भागातील रस्ते बांधकामाचा वेग तिपटीने वाढला आहे. देशात १७ लाख ८४ हजार वस्त्या आहेत. यापैकी १५ लाख ८० हजार वस्त्या या पक्क्या रस्त्याने जोडल्या गेल्या आहेत. याशिवाय विविध मेट्रो प्रकल्पांसाठी १७ हजार ७१४ कोटींची तरतूद करण्यात आहे. मागील वर्षी हीच तरतूद १४ हजार ४६२ कोटी इतकी होती.
रोज २७ कि.मी. महामार्गाचे बांधकाम
दररोज २७ किलोमीटर महामार्गाचे बांधकाम होत होत आहे. ‘सागरमाला’ प्रकल्पांतर्गत देशातील बंदरांचा विकास होत असून, आयात व निर्यातीसाठी ‘कार्गो’ बांधण्यात येत आहे. ईशान्येकडील राज्यांतूनदेखील ‘कंटेनर कार्गो’ची वाहतूक सुरू करण्यात येणार आहे.
ईशान्येकडील राज्यांसाठी ५८ हजार कोटी ईशान्येकडील अरुणाचल प्रदेश हे राज्य हवाई वाहतूक नकाशावर आले आहे. मेघालय, त्रिपुरा, मिझोरम या राज्यांना रेल्वेने जोडले. यंदा या राज्यांतील दळणवळणाच्या पायाभूत विकासासाठी २१ टक्के (५८ हजार १६६ कोटींची तरतूद) वाढ केली आहे.