Budget 2019: ... म्हणून अर्थसंकल्प लाल सूटकेसमधूनच संसदेत आणला जातो!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 02:02 PM2019-01-31T14:02:14+5:302019-01-31T14:03:38+5:30
159 वर्षांपासून लाल सुटकेसमधून अर्थसंकल्पाची कागदपत्रे संसदेत आणण्याची ही परंपरा आहे.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार 1 फेब्रुवारी रोजी संसदेत अंतरिम अर्थसंकल्प -2019 सादर करणार आहे. अंतरिम अर्थसंकल्प हा नवीन येणाऱ्या सरकारचा पूर्ण अर्थसंकल्प सादर होईपर्यंत अंमलात असतो. अंतरिम अर्थसंकल्पात फक्त जमाखर्चाचा तक्ता दिलेला असतो. या अर्थसंकल्पामध्ये कोणत्याही सवलती जाहीर करता येत नाहीत. कारण, सरकारने अर्थसंकल्पाचा आधार घेऊन मतदारांवर प्रभाव टाकू नये यासाठी तसा कायदा करण्यात आला आहे.
दरम्यान, हा अर्थसंकल्प संसदेत सादर करण्यापूर्वी अर्थमंत्रालयाकडून जास्त मेहनत घेतली जाते. संसदेत अर्थमंत्री अर्थसंकल्प सादर करताना त्यांच्या भाषणाकडे देशातील सर्व जनतेचे लक्ष लागलेले असते. तसेच, अर्थमंत्री ज्या लाल सुटकेसमधून अर्थसंकल्पाची कागदपत्रे संसदेत आणतात. ती लाल रंगाची सुटकेसही खास आहे. कारण, गेल्या 159 वर्षांपासून लाल सुटकेसमधून अर्थसंकल्पाची कागदपत्रे संसदेत आणण्याची ही परंपरा आहे.
1860 साली ब्रिटनचे चान्सलर ऑफ द एक्सचेकर चीफ विलियम एवर्ट ग्लॅडस्टन यांनी लेदर बॅगेतून पहिल्यांदा आर्थिक लोखाजोखा आणला होता. तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली. ब्रिटनच्या राणीने स्वतःहून विलियम एवर्ट ग्लॅडस्टन यांना ही खास सूटकेस गिफ्ट दिली होती.त्यानंतर नकळत लाल सुटकेसचा पायंडाच पडला. 26 नोव्हेंबर 1947 ला भारताला स्वातंत्र्यानंतर पहिला अर्थ संकल्प मांडण्यात आला. त्यावेळी षण्मुखम चेट्टी यांनीही पहिल्यांदा लाल सूटकेसमधून अर्थसंकल्प आणला होता. त्यानंतर दरवर्षी अर्थसंकल्प सादर करण्यासाठी अर्थमंत्री लाल रंगाची नवीन सुटकेस वापरतात.
संसदेत आत्तापर्यंत 'या' अर्थमंत्र्यांनी सादर केलाय अर्थसंकल्प
१९४७-४९ आर. के. षन्मुखम चेट्टी
१९४९-५० जॉन मथाई
१९५०-५७ सी. डी. देशमुख
१९५८-६३ मोरारजी देसाई
१९६३-६५ टी. टी. कृष्णमचारी
१९६५-६७ सचिंद्र चौधरी
१९६७-६९ मोरारजी देसाई
१९७१-७५ यशवंतराव चव्हाण
१९७५-७७ चिदम्बरम सुब्रहमयम
१९७७-७९ हरिभाई एम पटेल
१९८०-८२ आर. वेंकटरमण
१९८२-८४ प्रणब मुखर्जी
१९८४-८७ व्ही पी सिंह
१९८७-८८ एन डी तिवारी
१९८७ राजीव गांधी
१९८८-८९ शंकरराव चव्हाण
१९८९-९० मधु दंडवते
१९९०-९१ यशवंत सिंह
१९९१-९६ मनमोहन सिंह
१९९७-९८ पी चिदम्बरम
१९९९-२००१ यशवंत सिन्हा
२००३-०४ यशवंत सिन्हा
२००५-०८ पी चिदंबरम
२००९-१२ प्रणब मुखर्जी
२०१२-१४ पी चिदम्बरम
२०१४-१८ अरुण जेटली