Budget 2020: तुमचा पीएफ कापला जातो? मग जाणून घ्या नवे नियम; अन्यथा बसेल फटका!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2020 08:50 PM2020-02-01T20:50:13+5:302020-02-01T21:08:46+5:30
द्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज बजेट सादर केलं आहे.
नवी दिल्लीः केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज बजेट सादर केला आहे. बजेटच्या माध्यमातून निर्मला सीतारामण यांनी कराच्या टप्प्यात बदल केलेला आहे. आतापर्यंत जास्त पगार असलेल्या व्यक्तींना भविष्य निर्वाह निधी (EPF), नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS)च्या योजनांमधून प्राप्तिकरात सूट मिळत होती. पण ती सूट मोठ्या पगारदारांना मिळणं बंद होणार आहे. जर तुमचं वार्षिक गुंतवणुकीतलं योगदान 7.5 लाखांच्या वर आहे आणि आपण भविष्य निर्वाह निधी (EPF), नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS), Superannuation फंड अंतर्गत गुंतवणूक केलेली असल्यास प्राप्तिकर द्यावा लागणार आहे. तत्पूर्वी अशा योजनांमध्ये गुंतवलेल्या पैशांतून सूट मिळत होती. 1 एप्रिल 2021मध्ये याची अंमलबजावणी होणार असल्याचंही निर्मला सीतारामण यांनी सांगितलं आहे.
समजा आपलं वार्षिक उत्पन्न 30 लाख रुपये आहे. त्या 30 लाखांपैकी पीएफमध्ये 3.60 लाखांचं योगदान दिलं. तसेच NPSमध्ये 3 लाखांचं योगदान, Superannuation फंडात 1.50 लाखांचं योगदान, अशी एकूण गुंतवणूक 8.10 लाखांच्या घरात जाते. त्यामुळे या सर्व रकमेवर तुमच्याकडून वार्षिक 60 हजारांचा कर आकारला जाणार आहे. नवे टॅक्स स्लॅब ऐच्छिक असतील, अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. एखाद्या व्यक्तीला या सुविधांचा लाभ घ्यायचा असल्यास त्याला आतापर्यंत मिळणाऱ्या सवलती सोडाव्या लागतील.
विम्याचे हप्ते, गुंतवणूक, घर भाडं, मुलांचं शैक्षणिक शुल्क यासारख्या 70 मुद्द्यांच्या आधारे प्राप्तिकरात सवलत मिळते. मात्र नव्या टॅक्स स्लॅबचा फायदा घ्यायचा असल्यास त्यांना या सवलतीवर पाणी सोडावं लागेल. याआधी प्राप्तिकर भरताना या सगळ्या गोष्टींची माहिती दिल्यावर करात सवलत मिळत होती. एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न 7.5 लाख रुपये असल्यास त्याला सध्या 50 हजार रुपयांचा कर भरावा लागतो. मात्र नव्या टॅक्स स्लॅबनुसार त्याला केवळ 25 हजार रुपयेच कर भरावा लागेल.
सध्याच्या नियमांनुसार संबंधित व्यक्ती विम्याचे हप्ते, गुंतवणूक, घर भाडं, मुलांचं शैक्षणिक शुल्क यासारख्या 70 मुद्द्यांची माहिती देत असल्यास त्याला सवलत मिळते. ही सवलत घेऊन भराव्या लागणाऱ्या कराची रक्कम 25 हजारांपेक्षा खाली येत असल्यास जुनाच टॅक्स स्लॅब फायदेशीर ठरू शकतो. मात्र सर्व कागदपत्रांची पूर्तता करुनही संबंधित व्यक्तीला 25 हजारांपेक्षा जास्त कर भरावा लागत असल्यास त्याच्यासाठी नवा टॅक्स स्लॅब जास्त फायदेशीर ठरेल. नव्या टॅक्स स्लॅबनुसार कर भरताना त्याला कागदपत्रांची पूर्ततादेखील करावी लागणार नाही.