Budget 2020: 'या' नेत्याच्या नावावर आहे भारताचा सर्वाधिक अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 12:01 PM2020-01-30T12:01:37+5:302020-01-30T12:03:19+5:30
सर्वाधिक चार वेळा अर्थमंत्री असलेले पी. चिदंबरम यांनी संसदेत एकूण 8 अर्थसंकल्प सादर केले आहेत
नवी दिल्ली - संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरु होत असून अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. अर्थमंत्री निर्मला सितारामन मोदी सरकारमधील आपला दुसरा अर्थसंकल्प मांडतील. पण देशात सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा रेकॉर्ड कोणाच्या नावावर आहे हे तुम्हाला माहिती आहे का?
भारताचे माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी देशाचा अर्थसंकल्प सर्वाधिक वेळा संसदेत मांडला आहे. सर्वाधिक अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम त्यांच्यावर नावावर आहे. भारताचे चौथे पंतप्रधान होण्यापूर्वी त्यांनी अर्थमंत्री म्हणून 10 वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे. मोरारजीनंतर सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करणारे अर्थमंत्री पी. चिदंबरम आहेत. ज्यांनी संसदेत 8 वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे.
मोरारजी देसाई हे पहिल्यांदा 13 मार्च 1958 ते 29 ऑगस्ट 1963 पर्यंत देशाचे अर्थमंत्री होते. त्यानंतर मार्च 1967 ते जुलै 1969 या काळात त्यांनी पुन्हा अर्थमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला. या दरम्यान त्यांनी केंद्राचे 10 अर्थसंकल्प संसदेत सादर केले, त्यातील 8 वेळा संपूर्ण अर्थसंकल्प मांडला तर दोन वेळी अंतरिम अर्थसंकल्प मांडला होता. 1964 आणि 1968 या काळात असे काही प्रसंग आले जेव्हा मोरारजी देसाई यांनी त्यांच्या वाढदिवशी संसदेत सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला होता.
माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांचा जन्म गुजरातमधील वलसाड जिल्ह्यातील गावात 29 फेब्रुवारी 1896 रोजी झाला होता. 1977 मध्ये स्थापन झालेल्या बिगर-कॉंग्रेसच्या सरकारमध्ये मोरारजी देसाई पहिल्यांदाच पंतप्रधान झाले. 24 मार्च 1977 ते 28 जुलै 1979 पर्यंत ते देशाचे पंतप्रधान होते.
सर्वाधिक चार वेळा अर्थमंत्री असलेले पी. चिदंबरम यांनी संसदेत एकूण 8 अर्थसंकल्प सादर केले आहेत. एचडी देवगौडा यांच्या नेतृत्वात संयुक्त मोर्चाच्या सरकारमध्ये चिदंबरम 1 जून 1996 रोजी पहिल्यांदा अर्थमंत्री झाले. 21 एप्रिल 1997 पर्यंत ते अर्थमंत्री राहिले. यानंतर 1 मे 1997 पासून ते 19 मार्च 1998 पर्यंत तत्कालीन पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांच्या सरकारमध्ये ते अर्थमंत्री होते.
त्यानंतर डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वात यूपीए -1 सरकारमध्ये चिदंबरम 22 मे 2004 ते 30 नोव्हेंबर 2008 पर्यंत अर्थमंत्री होते. चिदंबरम हे 31 जुलै 2012 ते 26 मे 2014 या काळात चौथ्यांदा मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वात यूपीए -२ मधील अर्थमंत्री राहिले होते.