केंद्रीय अर्थमंत्र्यांची घोषणा; सिरमच्या 'न्युमोकॉकल' लसची राष्ट्रीय लसीकरण मोहीम राबविणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2021 09:08 PM2021-02-01T21:08:26+5:302021-02-01T21:28:43+5:30
लहान मुलांमध्ये न्युमोकॉकस या विषाणूच्या संसर्गाचे प्रमाण मोठे आहे. यामुळे नवजात अर्भके मोठ्या प्रमाणात मृत्यूमुखी पडतात...
पुणे : दरवर्षी न्युमोनियामुळे भारतात अंदाजे ५०,००० नवजात बालके दगावतात. मृत्यूदर रोखण्यासाठी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियातर्फे तयार करण्यात आलेल्या 'न्युमोकॉकल' या स्वदेशी बनावटीच्या लसीचा राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात समावेश करण्यात आला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना याबाबतची घोषणा केली.
लहान मुलांमध्ये न्युमोकॉकस या विषाणूच्या संसर्गाचे प्रमाण मोठे आहे. यामुळे नवजात अर्भके मोठ्या प्रमाणात मृत्यूमुखी पडतात. न्युमोकॉकल लस भारतीयांना कमी किमतीत उपलब्ध व्हावी, यासाठी सिरम इन्स्टिट्यूटने पुढाकार घेतला. ‘न्युमोसील’ ही स्वदेशी लसीचे केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या उपस्थितीत डिसेंबर २०२० मध्ये औपचारिक उदघाटन करण्यात आले होते. सिरमने डिसेंबरया लसीचा राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात समावेश केल्याच्या निर्णयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी स्वागत केले आहे. पुनावाला यांनी व्टिटमध्ये म्हटले आहे की, ‘आरोग्य क्षेत्र आणि लसीकरणातील गुंतवणूक ही कोणत्याही देशासाठी सर्वोत्तम गुंतवणूक ठरते. केंद्रीय अर्थसंकल्पात भरघोस तरतूद केल्याबद्दल निर्मला सीतारामन यांचे आभार मानतो. स्वस्थ भारत हाच कार्यक्षम भारत ठरु शकतो.’
देशातील ७० टक्के नागरिकांमध्ये सुप्तावस्थेतील लक्षणे दिसतात. जागतिक स्तरावरही पाच वर्षांखालील सर्वाधिक बालकांच्या मृत्यूचे कारण न्युमोनिया हे आहे. त्यापैकी २० टक्के लहान मुले भारतीय आहेत. आतापर्यंत लस आयात केली जात असल्याने सर्व बालकांना देणे शक्य होत नव्हते. न्युमोकॉकल लसीची बाजारातील किंमत ४५०० रुपये आहे. राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात समावेश केल्याने ही लस मोफत किंवा कमी किमतीत मिळू शकणार आहे. ५५ वर्षावरील व्यक्तींसाठीही ही लस फायदेशीर ठरणार आहे.