Budget 2021 Live : अर्थमंत्र्यांकडून मोठ्या रिफॉर्म्सची घोषणा, ७५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या पेन्शनधारकांना ITR मधून मुभा
By जयदीप दाभोळकर | Published: February 1, 2021 01:06 PM2021-02-01T13:06:57+5:302021-02-01T13:08:06+5:30
Budget 2021 Live : वित्तीय तूट ६.८ टक्क्यांवर जाण्याचा अंदाज, बाजारातून ८० हजार कोटी उभारणार
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत देशाचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. "ज्यावेळी जग मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे त्यावेळी सर्वांची नजर ही भारतावर आहे. अशा परिस्थितीत आपल्याला आपल्या करदात्यांना सुविधा देणं गरजेचं आहे," असं सीतारामन म्हणाल्या.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यावेळी ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी घोषणा केली. ७५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना आता करात सवलत देण्यात आली आहे. ७५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना आता ITR भरणं अनिवार्य नसेल. परंतु केवळ पेन्शनचा लाभ घेणाऱ्या व्यक्तींसाठी ही स्कीम लागू असणार आहे. "एनआरआय नागरिकांना अनेकदा कर भरण्यात अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. परंतु यावेळी त्यांना डबल टॅक्स सिस्टमधून सूट दिली जाणार आहे," असं सीतारामन म्हणाल्या. तसंच यावेळी त्यांनी स्टार्टअप्सनाही दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. ज्या स्टार्टअप्सना कर देण्यातून सुरूवातीला सूट देण्यात आली होती ती आता ३१ मार्च २०२२ पर्यंत वाढवण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, स्वस्त घरांसाठी करात मिळणारी सवलत एका वर्षासाठी वाढवण्यात आली आहे. यामुळे घर खरेदीस चालणार मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली. तसंच कस्टम ड्युटीसाठी नवी व्यवस्था आणि संरचना तयार करण्यात येणार असल्याची माहितीही अर्थमंत्र्यांनी दिली. याव्यतिरिक्त तीन वर्षांपेक्षा जुनी टॅक्सची प्रकरणी पुन्ही उघडली जाणार नाहीत. यापूर्वी ही मर्यादा सहा वर्षांची होती.
वित्तीय तूट ६.८ टक्क्यांवर
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या भाषणादरम्यान वित्तीय तूट ६.८ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला. तसंच यासाठी सरकारला ८० हजार कोटी रूपयांची आवश्यकता भासणार आहे. ती रक्कम येत्या दोन महिन्यांमध्ये बाजारातून उभारली जाणार असल्याचंही अर्थमंत्री म्हणाल्या. याव्यतिरिक्त न्यू स्पेस इंडिया लिमिटेड यावेळी PSLV-CS51 लाँच करणार असल्याची माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली. गगनयान मिशनचं मानवरहित पहिलं लाँच याच वर्षी डिसेंबर महिन्यात होणार आहे. इज ऑफ डुइंग बिझनेस अंतर्गत टर्बियूनल तयार करण्यात येणार आहे. यात कंपन्यांची प्रकरणं लवकरात लवकर संपवली जातील. तसंच आगामी जनगणना पहिल्यांदा डिजिटली केली जाईल, असंही सीतारामन यांनी स्पष्ट केलं.