Budget 2022: मोदी सरकारकडून मोठं सरप्राईज मिळण्याची शक्यता; यंदा सर्वात महत्त्वाची मागणी पूर्ण होणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 07:45 AM2022-01-31T07:45:38+5:302022-01-31T09:06:04+5:30
Budget 2022: करदात्या नोकरदार वर्गाला अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा
नवी दिल्ली: देशाचा अर्थसंकल्प (Budget 2022) उद्या मांडण्यात येणार आहे. महागाईपासून दिलासा मिळावा, कर सवलत मिळावी अशी अपेक्षा सर्वसामान्यांना आहे. प्राप्तिकरातून सूट मिळावी अशी आशा नोकरवर्गाला आहे. मोदी सरकारनं अनेकदा आश्चर्यचकीत करणारे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे नोकरदार वर्गाला दिलासा देण्यासाठी सरकार करात सवलत देईल अशी अपेक्षा आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या अर्थसंकल्प सादर करतील. त्यांचा हा चौथा अर्थसंकल्प असेल. प्राप्तिकरात सवलत देण्याची मागणी नोकरदार वर्गाकडून होत आहे. यंदा ही मागणी पूर्ण होईल अशी आशा आहे. यंदा सरकार कराच्या टप्प्यात बदल करून करदात्यांना दिलासा देईल, असं वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.
सर्वसामान्यांना कर सवलत देण्याबद्दलचा शेवटचा निर्णय ८ वर्षांपूर्वी घेण्यात आला आहे. मोदी सरकारनं २०१४ मध्ये प्राप्तिकरातील सवलतीची मर्यादा २ लाखांवरून २.५ लाखांवर नेली. त्यावेळी अरुण जेटली अर्थमंत्री होते. वयाची साठी ओलांडलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेली कर सवलतीची मर्यादा २.५ लाखांवरून ३ लाख करण्यात आली होती.
जाणकारांच्या अंदाजानुसार, यंदाच्या अर्थसंकल्पातून मोदी सरकार करदात्यांना मोठा दिलासा देऊ शकतं. सध्या २.५ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त आहे. ही मर्यादा आता ३ लाखांवर नेली जाऊ शकते. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी हीच मर्यादा ३ लाखांवरून ३.५ लाख केली जाण्याची शक्यता आहे.
सध्याची कर रचना काय?
० ते २.५ लाख- ० टक्के
२.५ ते ५ लाख- ५ टक्के
५ ते ७.५ लाख- १० टक्के
७.५ ते १० लाख- १५ टक्के
१० ते १२.५० लाख- २० टक्के
१२.५० ते १५ लाख- २५ टक्के
१५ लाखांच्या पुढे- ३० टक्के