Budget 2022: 'अतिरिक्त कर लावू नका', पंतप्रधानांनी दिल्या होत्या स्पष्ट सूचना- निर्मला सीतारामन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2022 10:35 AM2022-02-02T10:35:35+5:302022-02-02T10:35:47+5:30
Budget 2022: अर्थसंकल्पात आयकर स्लॅबमध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नाही, निर्मला सीतारमण यांनी यावर भाष्य केले.
नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल संसदेत देशाचा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात आयकर स्लॅबमध्ये कुठलाही बदल करण्यात आला नाही. दरम्यान, पत्रकारांशी संवाद साधताना सीतारमण यांनी यावर भाष्य केले. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोव्हिड महामारीच्या काळात कर वाढवू नयेत असे निर्देश दिले होते. त्यामुळेच आम्ही आयकर स्लॅबमध्ये बदल केला नाही', अशी माहिती सीतारमण यांनी दिली.
केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कर कपातीची मर्यादा 10 टक्क्यांवरुन 14 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा प्रस्तावही अर्थमंत्र्यांनी मांडला आहे. याबाबत बोलताना त्या म्हणाल्या, या निर्णयामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षेचा लाभ मिळेल आणि त्यांना केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने आणले जाईल.
दरम्यान, अर्थसंकल्पानंतर देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, या अर्थसंकल्पाचा सर्वांना फायदा होईल, विशेषत: गरीब आणि समाजातील मागासलेल्या लोकांसाठी हा अर्थसंकल्प अधिक पायाभूत सुविधा, अधिक गुंतवणूक, अधिक विकास आणि अधिक नोकऱ्या देणारा आहे. या अर्थसंकल्पाचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे गरिबांचे कल्याण, असे ते म्हणाले.