Budget 2022: अर्थसंकल्पात विद्यार्थ्यी आणि तरुणांना काय मिळालं ? वाचा एका क्लिकवर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2022 02:23 PM2022-02-01T14:23:38+5:302022-02-01T14:25:13+5:30
मेक इन इंडिया अंतर्गत 60 लाख नोकऱ्यांची घोषणा सरकारने केली आहे.
नवी दिल्ली: कोरोना महामारीमुळे मुलांचे शिक्षण रखडले होते. युनेस्कोच्या अहवालानुसार याचा सर्वाधिक फटका इयत्ता 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना बसला आहे. भारतात या वयोगटात 13 कोटींहून अधिक विद्यार्थी येतात. या विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षणासोबत रोजगाराच्या संधी हव्या आहेत. जाणून घेऊया या बजेटमधून विद्यार्थ्यांना काय मिळणार आहे.
2022-2023 च्या अर्थसंकल्पात प्रधानमंत्री ई-विद्या योजनेंतर्गत एक वाहिनी एक वर्ग योजना सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या अंतर्गत 200 ई-विद्या टीव्ही चॅनेल उघडण्यात येणार आहेत. या योजनेचा लाभ घेऊन इयत्ता 1 ली ते 12 वी पर्यंतची मुले ऑनलाईन अभ्यास करू शकतील. यासोबतच मुलांना प्रादेशिक भाषेत शिक्षणाची सुविधाही दिली जाणार आहे.
डिजिटल विद्यापीठ
कोविडमुळे प्रभावित झालेल्या शिक्षणाला चालना देण्यासाठी मोदी सरकार प्रयत्नशील आहे. यासाठीच डिजिटल विद्यापीठ उघडले जाईल. हे विद्यापीठ अनेक भाषांमधून विद्यार्थ्यांना शिकवेल. देशातील आघाडीच्या विद्यापीठांना या कार्यक्रमाशी जोडून शिक्षणाचा स्तर वाढवला जाईल, अशी घोषणा केंद्राकडून करण्यात आली आहे. याशिवाय, देशभरात सुमारे 2 लाख अंगणवाड्या आधुनिक करण्यात येणार आहेत.
अर्थसंकल्पात रोजगाराची चर्चा
- अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितल्यानुसार, आत्मनिर्भर भारत अंतर्गत 16 लाख नोकऱ्या देण्यात येणार आहेत.
- तसेच, मेक इन इंडिया अंतर्गत 60 लाख नोकऱ्यांची घोषणा सरकारने केली आहे. याशिवाय,
- रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी कौशल्य विकास कार्यक्रम नव्याने सुरू केले जाणार आहेत.
- आवश्यकतेनुसार राज्यात सुरू असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण केंद्रांनाही अपग्रेड केले जाईल.