Budget 2022: २०३० चा प्लॅन! देशाच्या विकासासाठी 'इंजिन' महत्त्वाचं; अर्थसंकल्पात रेल्वेसाठी निधी वाढण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 08:58 PM2022-01-31T20:58:07+5:302022-01-31T21:01:21+5:30
Railway Budget 2022-23: राष्ट्रीय रेल्वे योजनेत वाहतूक २६-२७ टक्क्यांवरून ४०-४५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याची तयारी आहे. हे तेव्हाच होईल जेव्हा रेल्वेच्या अर्थसंकल्पात तरतूद वाढवली जाईल.
नवी दिल्ली – उद्या १ फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. या अर्थसंकल्पात रेल्वेला पूर्वीपेक्षा जास्त निधी मिळण्याची शक्यता आहे. सोमवारी जाहीर झालेल्या आर्थिक सर्वेक्षणात रेल्वे भारताच्या विकासाचं वेगानं वाढणारं एक साधन असल्याचं दिसून येते. रेल्वेचे भविष्य अधिक सुवर्ण करण्यासाठी त्याकडे अधिक लक्ष देण्याचे सांगण्यात आले आहे. रेल्वेमध्ये निधीची तरतूद वाढवण्याची गरज असल्याचे आर्थिक सर्वेक्षणात म्हटले आहे. या निधीची गरज केवळ प्रवाशांच्या मागणीसाठी नाही, तर मालवाहतुकीत रेल्वेचा आदर्श वाटा वाढवण्यास मदत होईल.
राष्ट्रीय रेल्वे योजनेत वाहतूक २६-२७ टक्क्यांवरून ४०-४५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याची तयारी आहे. हे तेव्हाच होईल जेव्हा रेल्वेच्या अर्थसंकल्पात तरतूद वाढवली जाईल. आर्थिक सर्वेक्षणातील या गोष्टी लक्षात घेता केंद्र सरकार रेल्वे बजेटमध्ये मोठी वाढ करू शकते. राष्ट्रीय रेल्वे योजना किंवा NRP नुसार, २०३० पर्यंत, रेल्वेने होणारी मालवाहतूक सध्याच्या ४७०० मेट्रिक टनांच्या पातळीवरून ८२०० मेट्रिक टनांपर्यंत वाढेल. पुढील १० वर्षांसाठी रेल्वेच्या भांडवली भांडवलात मोठी वाढ होणार आहे. मागणीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी रेल्वेलाही क्षमता वाढवावी लागेल. २०३० ची कालमर्यादा लक्षात घेऊन हे काम पूर्ण करावे. २०१४ पर्यंत, रेल्वेचे भांडवल वार्षिक ४५,९८० कोटी रुपये होते. त्यावेळी रेल्वे अनेक अकार्यक्षमता आणि गर्दीच्या मार्गांशी लढत होती. त्यामुळे उत्पन्नावरही वाईट परिणाम दिसून आला. २०१४ नंतर रेल्वेकडे गांभीर्याने लक्ष देण्यात आले आणि कॅपेक्स वाढविण्यात आला. २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी रेल्वेचे कॅपेक्स बजेट २,१५,००० कोटी रुपये होते, जे २०१४ च्या पातळीपेक्षा ५ पट जास्त होते.( Expected Railway Budget 2022)
आर्थिक वाढीमध्ये रेल्वेची भूमिका
आर्थिक सर्वेक्षणात असे म्हटले आहे की, अनेक रेल्वे प्रकल्प सुरू आहेत आणि अनेक प्रकल्प येणाऱ्या काळात प्रस्तावित आहेत, भांडवली निधीसाठी नवीन मार्ग तयार केले गेले आहेत, ज्यामुळे आगामी काळात कॅपेक्समध्ये मोठी वाढ होईल. यामुळे संपूर्ण रेल्वे यंत्रणा देशाच्या विकासाचे इंजिन म्हणून उदयास येईल. आगामी काळात देशाच्या आर्थिक प्रगतीत रेल्वेची मोठी भूमिका पाहायला मिळणार आहे.
आर्थिक पाहणीत हवाई प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याची चर्चा आहे, तर रेल्वे अजूनही जुन्या काळात परतलेली नाही. सर्वेक्षणानुसार, हवाई प्रवासी वाहतूक कोरोनापूर्वीच्या काळात परतली आहे, परंतु रेल्वे वाहतूक अजूनही खूप मागे आहे. प्रवाशांच्या मासिक आकडेवारीनुसार हे सांगण्यात आले आहे. सर्वेक्षणात असे म्हटले आहे की २०२१-२२ मध्ये (डिसेंबरपर्यंत), भारतीय रेल्वेची एकूण मालवाहतूक १,०२९.९४ दशलक्ष टन (MT) होती, जी २०२०-२१ मधील याच कालावधीतील ८७०.०८ वरून १८.३७ टक्क्यांनी वाढली आहे. भारतीय रेल्वेने कोविड महामारीपूर्वी (२०१९-२०) वर्षभरात मालवाहतुकीत सुमारे १६ टक्के वाढ नोंदवली, त्याच कालावधीच्या तुलनेत, जेथे मालवाहतूक ८८८.८८ मेट्रिक टन होती.
आर्थिक सर्वेक्षणात काय म्हटले आहे?
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी संसदेत आर्थिक सर्वेक्षण २०२१-२२ सादर केले. चालू आर्थिक वर्षात अर्थव्यवस्था ९.२ टक्क्यांनी वाढेल अशी अपेक्षा सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आली आहे. यावरून देशाची अर्थव्यवस्था प्री-कोरोना स्तरावर पोहोचल्याचे दिसून येते आणि हे अर्थव्यवस्थेत चांगली सुधारणा झाल्याचं सूचित करते. कोविडचा प्रभाव आणि त्यानंतर कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊनमुळे २०२०-२१ मध्ये अर्थव्यवस्था ७.३ टक्क्यांनी घसरली. पुढील आर्थिक वर्षात (२०२२-२३) भारतीय अर्थव्यवस्था ८ ते ८.५ टक्के दराने वाढेल, असे सर्वेक्षणात म्हटले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी संसदेत मांडलेल्या २०२१-२२ च्या आर्थिक सर्वेक्षणात हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.