Budget 2024: अर्थसंकल्प निराशाजनक : विराेधकांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2024 07:39 AM2024-02-02T07:39:17+5:302024-02-02T07:39:36+5:30
Budget 2024: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या लेखानुदानावर विराेधकांनी निराशा व्यक्त केली. आपले अपयश हे यश म्हणून दाखविण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची टीका प्रमुख विराेधी पक्ष काँग्रेसने केली.
नवी दिल्ली - अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या लेखानुदानावर विराेधकांनी निराशा व्यक्त केली. आपले अपयश हे यश म्हणून दाखविण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची टीका प्रमुख विराेधी पक्ष काँग्रेसने केली.
काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी अर्थसंकल्पाचे वर्णन ‘लहान’ आणि ‘निराशाजनक’ असे केले. ते म्हणाले, आपल्या अपयशाला यश म्हणून दाखविण्याचे सरकारकडे काैशल्य आहे. अर्थसंकल्पीय भाषण खूप लहान आणि निराशाजनक हाेते. अनेक मुद्द्यांना त्यात स्पर्श केलेला नाही. देशातील ४५ टक्के युवक बेराेजगार असताना तुम्ही युवा सक्षमीकरणावर बाेलू शकत नाही.
सीतारामन यांनी थेट परकीय गुंतवणुकीबाबत (एफडीआय) उल्लेख केला. मात्र, यूपीए सरकारच्या काळातील एफडीआय ३.६ टक्क्यांवरून सध्याच्या जीडीपीच्या १ टक्क्यावर आल्याचे सांगायचे त्या विसरल्या.
लोकप्रिय घोषणा का नाहीत?
निवडणूक वर्ष असतानाही लोकप्रिय घोषणांना फाटा देत सरकार आर्थिक बाबतीत किती गंभीर आहे, हे या अर्थसंकल्पातून दिसून येते. सरकारने केलेल्या घोषणा वास्तववादी असून, त्या पूर्णपणे साध्य करता येतील, असा अंदाज अर्थशास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्थांवर सरकारचे लक्ष केंद्रित आहे. सरकार आर्थिक वाढीचे विविध फायदे सर्वांपर्यंत पोहोचवू इच्छित आहे, जे सध्या काही प्रमाणात उच्च उत्पन्न गट असलेल्या शहरी कुटुंबांना मिळत आहेत. सरकार वित्तीय तूट कमी करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे अर्थसंकल्पावरून दिसते, असे अर्थशास्त्रज्ञांनी म्हटले आहे.
काँग्रेसचे खासदार मनीष तिवारी म्हणाले, सरकारने फक्त स्वत:चा उदाेउदाे केला. चालू आर्थिक वर्षात १८ लाख काेटी रुपयांचा ताेटा आहे. पुढील वर्षी ताे आणखी वाढणार आहे. सरकार कर्ज घेऊन खर्च चालवत असल्याचे यावरून स्पष्ट हाेत आहे. ‘सपा’चे नेते अखिलेश यादव यांनी सांगितले की, अर्थसंकल्प जनतेच्या विकासासाठी नसल्यास ते व्यर्थ आहे. अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत काैर बादल म्हणाल्या की, हा अर्थसंकल्प वास्तविकतेपासून खूप दूर आहे.