‘बजेट ही सुरुवात, जे शक्य तेच केले’
By admin | Published: July 14, 2014 12:31 AM2014-07-14T00:31:00+5:302014-07-14T00:31:00+5:30
प्राप्त परिस्थितीत जे करणे शक्य होते तेच आपण केले - केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली
नवी दिल्ली : ही प्रवासाची केवळ सुरुवात आहे. प्राप्त परिस्थितीत जे करणे शक्य होते तेच आपण केले आहे, असे सांगत केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी रविवारी अर्थसंकल्पात सुधारणांच्या आघाडीवर फारसे काही केलेले नसल्याची विरोधकांची टीका फेटाळून लावली.
‘ही आमच्या प्रवासाची सुरुवात आहे, शेवट नाही. जेवढे करणे शक्य होते तेवढे आम्ही केले. पहिल्याच दिवशी सर्व निर्णय घेतले जात नाही, असे जेटली म्हणाले. जेटली यांनी १० जुलै रोजी आपला पहिला केंद्रीय अर्थसंकल्प मांडला होता. गत तारखेपासून करण्यात आलेले कर संशोधन मागे न घेणे आणि उद्योगांना पुरेशा सवलती न दिल्याबद्दल रेटिंग एजन्सींकडून जेटलींवर सारखी टीका केली जात आहे. तथापि जेटली यांनी या अर्थसंकल्पात नोकरदार वर्गाला दिलासा देत २२२०० कोटी रुपयांचा प्रत्यक्ष कर सोडून दिलेला होता.
सरकारने अनेक महत्त्वपूर्ण पावले उचललेली आहेत. तसे करणे आवश्यक होते. कारण मागील दहा वर्षांत या दिशेने कोणतेही पाऊल उचलण्यात आलेले नव्हते, असे नमूद करून जेटली म्हणाले, यात सर्वच मुद्दे मग ते विमा असो वा रियल इस्टेट, संरक्षण, गत तारखेपासून कर संशोधन, कर निर्धारणाचे सुलभीकरण, ट्रान्स्फर प्राईजिंग हे सर्व महत्त्वपूर्ण होते. त्यामुळे ४५ दिवसांत आम्ही त्याकडे लक्ष घालण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही निर्गुंतवणूक क्षेत्राकडेही लक्ष दिले आहे.
हे महत्त्वाचे निर्णय होते. आणखी सवलत दिली जाणार असलेल्या क्षेत्रांबाबत आमची भूमिका अगदी स्पष्ट आहे. सर्वसामान्य माणसावर आणखी किती बोजा टाकणार? याच कारणामुळेआम्ही व्यक्तिगत कर निर्धारण तर्कसंगत बनविण्याचा प्रयत्न केला आहे. वित्तीय स्थिती बळकट करण्याच्या दिशेने विस्तृत कार्ययोजना सादर केली नसल्याच्या आरोपाला उत्तर देताना जेटली म्हणाले, ‘याबाबत मी विस्तृत चर्चा केलेली नाही. कारण मी व्यय प्रबंधन आयोग गठीत करण्याचा प्रस्ताव दिला आहे. वित्तीय तूट कमी करण्याचे दोन मार्ग आहेत. खर्च कपात करणे आणि उत्पन्नात वाढ करणे. ४५ दिवसांत मी जास्तीत जास्त समस्यांवर लक्ष देण्याचा प्रयत्न केला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)